- इस्माईल जहागीरदारवसमत : रस्ता ओलांडताना एका वाहनाचा धक्का लागल्याने बिबट्या जखमी झाल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी वसमत तालुक्यातील सिंदगी खांडी भागात घडला. ही माहिती मिळाल्यानंतर वनविभागाचे पथक सिंदगी येथील जंगलामध्ये बिबट्याचा शोध घेत आहे.
तालुक्यातील सिंदगी, बोल्डा या परिसरात वनक्षेत्र आहे. ९ सप्टेंबर रोजी सकाळी १०:३० वाजण्याच्या सुमारास एक वाहन या रस्त्याने जात असताना रस्ता पार करणाऱ्या बिबट्याला या वाहनाचा धक्का लागला. यात हा बिबट्या काही वेळ बेशुद्धही झाला होता. घटनेनंतर एकच धावपळ झाली. सिंदगी खांडीत बिबट्या असल्याची माहिती वनविभागाला देण्यात आली. वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल होईपर्यंत बेशुद्ध अवस्थेत असलेला बिबट्या शुद्धीवर येऊन वनक्षत्रामध्ये पसार झाला आहे. दरम्यान, सिंदगी खांडीतील वनक्षेत्रामध्ये जखमी बिबट्याचा वन विभागाचे पथक शोध घेत आहे. दुपारी साडेबारा वाजेपर्यंत बिबट्याचा शोध लागला नव्हता.
ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरणया बिबट्याच्या कमरेला मार लागला असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. सिंदगी परिसरात बिबट्याचा वावर पूर्वीपासूनच आहे. एका पोलीस अधिकाऱ्यालाही काही दिवसांपूर्वी बिबट्याचे दर्शन झाले होते. परिसरात बिबट्या असल्याने ग्रामस्थांमध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे. तालुक्यातील सिंदगी,कोठारी,सुकळी,बोल्डा या भागात बिबट्याचे अस्तित्व असल्याचे यापूर्वीही अनेक वेळा समोर आले आहे. वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.