वसमत (जि. हिंगोली) : कुटुंबीय लग्नात व्यस्त असल्याची संधी साधून वसमत येथील विष्णूनगरात घर फोडून चोरट्यांनी रोख रकमेसह सोन्याचे दागिने, असा एकूण पाच लाख ८७ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना १३ जुलै रोजी दुपारी उघडकीस आली.
सूर्यकांत बंडाप्पा बेंबळगे यांचे विष्णूनगरमध्ये घर आहे. बेंबळगे यांच्या मुलाचे लग्न वसमत येथील एका मंगल कार्यालयात १३ जुलै रोजी पार पडले. यावेळी घरातील सर्वजण मंगल कार्यालयात होते. याचवेळी घरी कोणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून कपाटातील रोख एक लाख पाच हजार रुपये, ३५.९० ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार, १.५ तोळे वजनाचे सोन्याचे शॉर्ट गंठण, असा एकूण पाच लाख ८७ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
दुपारी काही कामानिमित्त बेंबळगे घरी आले असता चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सूर्यकांत बेंबळगे यांच्या फिर्यादीवरून चोरट्यांविरुद्ध वसमत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. या प्रकरणाचा तपास पोलिस करीत आहेत.