- इब्राहीम जहागिरदारकुरुंदा (जि. हिंगोली) : वसमत तालुक्यातील पांगरा (शिंदे) भागातील माळरानात बुधवारी वणवा पेटल्याने मोठ्या प्रमाणावर जंगलातील छोटी-मोठी झाडे व वनौषधी वेली जळाली. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जंगलासह इतर शेतकऱ्यांचेही नुकसानही झाले. ही घटना ५ मार्च रोजी दुपारच्या सुमारास घडली. आग आटोक्यात आणण्यासाठी या भागातील शेतकऱ्यांनी प्रयत्न केला. माळरानाची पाहणी करण्यासाठी वन कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. पंचनाम्यानंतर कार्यक्षेत्रांतर्गत किती भाग जळाला, हे स्पष्ट होणार असल्याचे सांगितले.
पांगरा (शिंदे) परिसरात माळरानाचा जंगल मोठ्या प्रमाणात विस्तारित आहे. दोन वर्षांपासून माळरानात विविध प्रकारच्या झाडांची लागवड केली आहे. उन्हाळा आला की जंगलात वणवा पेटण्याच्या घटना घडत आहेत. दुपारच्या सुमारास ही घटना घडताच सर्वात आधी आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. परंतु आग आटोक्यात न आल्याने दिवसभर वणवा पेटल्याचे चित्र पाहावयास मिळत होते. भडकलेल्या आगीत छोटी झाडेझुडपे, वेली, काही शेतकऱ्यांचे उन्हाळी पीक आदी मोठ्या प्रमाणात जळून खाक झाले. आगीची झळ अनेक शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचली. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. जंगलात आग कशामुळे लागली? हे मात्र घटनास्थळी पोहोचलेल्या अधिकाऱ्यांना कळू शकले नाही.
पाहणीसाठी घटनास्थळी पथक दाखल....पांगारा (शिंदे) भागातील माळरानात आग लागल्याची माहिती मिळताच वन कर्मचारी पाहणीसाठी गेले आहेत. पाहणी केल्यानंतर वनविभागाच्या कार्यक्षेत्रातील किती भाग जळाला, हे स्पष्ट होईल, असे वनपरिक्षेत्र अधिकारी रंगराव पाटील यांनी सांगितले.
वन्यप्राणी पळू लागले सैरावैरा...पाण्याच्या शोधात आलेले हरीण, रानडुक्कर, वानर, लालतोंडी माकडे, नीलगाय आदी वन्यप्राणी आगीच्या ज्वाळामुळे सैरावैरा पळत होते. दुपारी दीड-दोन वाजेच्या सुमारास प्रखर ऊन असल्यामुळे आग आटोक्यात आणण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.