उमेदवारीबाबत अनिश्चितता, हेमंत पाटील समर्थक पुन्हा सक्रिय, ताफा मुंबईकडे रवाना

By विजय पाटील | Published: April 2, 2024 04:24 PM2024-04-02T16:24:20+5:302024-04-02T19:18:59+5:30

उमेदवारी दाखल करण्यासाठी शेवटचे दोन दिवस बाकी आहेत

Hemant Patil supporters again active, convoy leaves for Mumbai | उमेदवारीबाबत अनिश्चितता, हेमंत पाटील समर्थक पुन्हा सक्रिय, ताफा मुंबईकडे रवाना

उमेदवारीबाबत अनिश्चितता, हेमंत पाटील समर्थक पुन्हा सक्रिय, ताफा मुंबईकडे रवाना

हिंगोली : लोकसभेमध्ये महायुतीत सुरू असलेला संगीत खुर्चीचा खेळ उमेदवारी दाखल करण्याचे शेवटचे दोन दिवस उरले असतानाही संपायला तयार नाही. भविष्यात होणारे नुकसान लक्षात घेता भाजपची मंडळी बॅकफूटवर गेल्याने खा. हेमंत पाटील यांच्या समर्थकांनी उचल खाल्ली आहे. पाटील यांनाच उमेदवारीच्या मागणीसाठी मुंबईकडे ते रवाना झाले आहेत.

हिंगोली लोकसभेची उमेदवारी शिंदे गटाचे खा. हेमंत पाटील यांना जाहीर झाल्यानंतर भाजपच्या मंडळीने बैठका घेवून त्यांची डोकेदुखी वाढविली. या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांनी केलेले आकांडतांडव पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचले. त्यानंतर शिंदे गटाकडून उमेदवार बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. मात्र भाजपच्या तालावर नाचायचे किती व कुठे कुठे? अशी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची भावना आहे. नांदेडातही त्याचे पडसाद उमटल्याचे पहायला मिळाले. इतर लोकसभा मतदारसंघांमध्ये तसेच आगामी विधानसभेत भाजपला शिंदे गटाची मदत लागणार नाही का? असा सवाल केला जात आहे. शिंदे गटाकडून पाटील यांच्याऐवजी बाबूराव कदम यांना उमेदवारी दिली जाणार असल्याच्या चर्चेनंतर आज पुन्हा वेगळ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. तर भाजपच्या शिष्टमंडळाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाद दिली नसल्याने पाटील समर्थकही जागे झाले आहेत. 

झुकेगा नही...
मित्रपक्षांना भाजपने आतापर्यंत संपविण्याचेच काम केले. हिंगोलीतही तसेच करण्याचा डाव आहे. त्यामुळे उमेदवारी बदलून भाजपपुढे झुकण्याची भूमिका घेण्यास शिवसेनेचे कार्यकर्ते तयार नाहीत. उमेदवाराबद्दल नाराजी नसताना ती पसरवण्याचे षडयंत्र भाजपच्या मंडळीनेच उमेदवारीच्या स्वार्थापोटी केल्याचे शिवसैनिकांचे म्हणने आहे. त्यामुळे हा डाव उधळण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. भाजपसमोर कोणत्याही परिस्थिती झुकायचे नाही, अशी शिवसैनिकांची भूमिका आहे.

Web Title: Hemant Patil supporters again active, convoy leaves for Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.