हॉकर्सचे रॉकेल जातेय काळ्या बाजारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 12:14 AM2019-04-08T00:14:58+5:302019-04-08T00:15:38+5:30

शहरातील राशनकार्ड धारकांसाठी हॉकर्सला मिळालेला रॉकेलचा कोटा हॉकर्स वितरित न होता सरळ काळ्या बाजारात नेऊन विकण्याचा प्रकार घडत आहे.

 The Hawker's Rococo in the Black Market | हॉकर्सचे रॉकेल जातेय काळ्या बाजारात

हॉकर्सचे रॉकेल जातेय काळ्या बाजारात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वसमत : शहरातील राशनकार्ड धारकांसाठी हॉकर्सला मिळालेला रॉकेलचा कोटा हॉकर्स वितरित न होता सरळ काळ्या बाजारात नेऊन विकण्याचा प्रकार घडत आहे. अनेक हॉकर्स तर दोन-दोन वर्षांपासून पॉर्इंटवर फिरकत नाही. पुरवठा विभागाचे अधिकाऱ्यांनी तपासणी करणेच बंद केल्याने हा खेळ सुरू आहे. काळ्या बाजारात रॉकेल खुलेआम मिळत आहे.
वसमत शहरातील लाभार्थ्यांना रॉकेल वितरणासाठी हॉकर्स नियुक्त आहेत. या हॉकर्सला कार्डच्या संख्येनुसार रॉकेलचा कोटा मिळत असतो. दरमहा ठराविक कोटा हॉकर्स चालकांना मिळत असतो. द्वारपोच रॉकेल वितरण यंत्रणेअंतर्गत वसमत शहरासाठी ही व्यवस्था आहे. प्रत्येक राशन दुकानदाराजवळ हॉकर्सला मिळालेले रॉकेल वितरणासाठीचा पॉर्इंटसुद्धा फिक्स आहे. कधी काळी नियमित पणे हॉकर्स पॉर्इंटवर रॉकेल वितरित करतात. मात्र आता चक्क संपूर्ण उचललेला कोटा सरळ काळ्या बाजारात विकल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार पहावयास मिळत आहे.
पुरवठा विभागाचे अधिकारी, तहसीलदार यांच्यामार्फत रॉकेल वितरीत व्यवस्थित होते की नाही, यावर कायम देखरेख ठेवणे अपेक्षित असते. मात्र दोन वर्षांपासून काळ्याबाजारातच रॉकेल विकण्याचा परवाना मिळाल्यासारखे वातावरण वसमतमध्ये पहावयास मिळत आहे. कारण एकाही पॉर्इंटवर हॉकर्स हजेरी लावत नाहीत.
दरमहा कोटा तर हमखास उचलल्या जात आहे. एवढा मोठा घोटाळा होत असताना वसमतचे पुरवठा विभागाचे अधिकारी तहसीलदार मात्र काहीच घडत नाही, अशा पद्धतीने याकडे पाहतात. लाभार्थ्यांची तक्रार नाही, या सबबीखाली शासनाचे रॉकेल वितरीत न करता काळ्याबाजारात विकण्याच्या भयंकर प्रकाराकडे न पाहण्याची अजब भूमिका घेतली जात आहे.
गॅसधारकांना रॉकेल मिळणार नाही, असा शासनाचा निर्णय आहे. म्हणून गॅसधारकांच्या नावाचा कोटा कमी झाला एवढे खरे आहे. त्याचा लाभ हॉकर्सवाल्यांनी उचलला आहे. शहरात रॉकेल वितरण बंद झाले आहे, अशी अफवा हॉकर्स धारकांकडून पसरवण्यात आली. परिणामी लाभार्थ्यांनीही रॉकेल बंद झाले, असा समज करून घेतला. त्यामुळे दोन वर्षांपासून शहरात रॉकेल मिळत नाही तरीही तक्रार होत नाही. महसूल विभागाचे अधिकारीही तक्रार नाही म्हणून चौकशी नाही, असा पवित्रा घेत आहे. अधिकाऱ्यांच्या अशा बेजवाबदार पद्धतीने वसमतमध्ये रॉकेलचा काळाबाजार सुरू आहे. नियमित तपासण्या झाल्यातर या प्रकाराचे बिंग फुटू शकते. मात्र तपासणी होणार नाही, असा स्पष्ट संदेश हॉकर्स धारकांना असल्याने ते उचललेला रॉकेलचा कोटा राशनकार्ड धारकांना वितरित न करता सरळ काळ्या बाजारात विकून मोकळे होत आहेत. हा प्रचंड मोठा रॉकेल घोटाळा दडपण्याचाच प्रकार साखळी पद्धतीने यशस्वी होत आहे. पुरवठा विभागाकडून हॉकर्सने किती रॉकेल वितरीत केले याचीच तपासणी बंद करण्यात आल्याने हॉर्कसला रान मोकळे झाले आहे.
या प्रकरणी पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार निलेश पळसकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हॉकर्सला दरमहा रॉकेलचा कोटा दिला जातो, कोण्याही महिन्याचे रॉकेल देणे शिल्लक नाही, हे स्पष्ट सांगितले. मात्र हॉकर्स लाभार्थ्यांना वितरीत करतात की नाही, याची तपासणी त्यांनी पदभार घेतल्यापासून तरी झालेली नाही हे सध्या त्यांनी मान्य केले. तपासणी कधी होणार, हे त्यांना सांगता आले नाही. हॉकर्सकडे पाँईटवर वितरण केलेले रॉकेलची नोंद रजिस्टर असणे गरजेचे असते. त्याची तपासणी व पडताळणी वेळोवेळी पुरवठा विभागाकडून होणे अपेक्षित असते. तपासणीच ठप्प झाल्याने काळ्या बाजाराला रान मोकळे झाले आहे.
वसमत येथील सामाजिक कार्यकर्ते तथा माहिती अधिकार कार्यकर्ते आवेस अन्सारी यांनी रॉकेल वितरणासंदर्भात माहिती अधिकार कायद्याअन्व्ये माहिती मागितली होती. डिसेंबर महिन्यात त्यांनी अर्ज दिला होता. त्यांना माहिती मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी पहिले अपील केले होते. त्यातही माहिती मिळाली नाही. आता दुसरे अपील करणार असल्याचे त्यांनी सांगितले. वसमत शहरात हॉकर्स वितरण होत नाही तसेच ग्रामीण भागातही असाच प्रकार सुरू असल्याचे आवेस अन्सारी यांनी सांगितले. माहिती अधिकार कायद्यालाही दाद मिळेना.

Web Title:  The Hawker's Rococo in the Black Market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.