हिंगोली जिल्ह्यात २३ ते २९ मार्चदरम्यान एकूण पाच हजार ९६५ जणांच्या अँटिजेन व आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आल्या. यापैकी ७८० जण पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामुळे जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट १३ टक्के आहे.
हिंगोली जिल्ह्यात मार्च महिन्यामध्ये प्रशासनाने दोनदा टाळेबंदी केली. पहिली १ ते ७ मार्च, तर दुसरी २९ मार्च ते ४ एप्रिलदरम्यान केली आहे. शिवाय दुकानांची वेळ कमी केली आहे. चाचणी केल्याशिवाय व्यापार करू दिला जात नाही, मास्क वापरणे सक्तीचे केले. मात्र, नागरिक नियम पाळत नसून, प्रशासनाचे उपाय कुचकामी ठरत आहेत. गृह विलगीकरणात असलेल्या लोकांवर नजर ठेवण्यासाठी शिक्षकांची नेमणूक केली. मात्र, त्याचाही उपयोग होत नाही. शिक्षक हे काम करीत नसल्याचे दिसत आहे. प्रशासनाच्या प्रत्येक उपायावर नागरिक पळवाट शोधत असल्याने कोरोना वाढतच चालला आहे.
सध्या कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी विनामास्क फिरू नये, सामाजिक अंतर ठेवावे, बाजारात गर्दी करू नये, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सूर्यवंशी यांनी केले आहे.