गुंतवणुकीवर १२ टक्के परताव्याचे आमिष देऊन सव्वा सहा कोटींची फसवणूक
By चंद्रमुनी बाबूराव बलखंडे | Published: May 4, 2024 02:19 PM2024-05-04T14:19:52+5:302024-05-04T14:21:41+5:30
पतसंस्थेच्या अध्यक्षांसह ११ जणांवर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
हिंगोली : इतर संस्थेच्या तुलनेत गुंतवणुकीवर १० ते १२ टक्केपर्यंत परतावा देण्याचे अमिष दाखवून ४०३८ ठेवीदारांची ६ कोटी २७ लाख ६५ हजार १३० रूपयांची आर्थिक फसवणूक केली. या प्रकरणी अनुराधा अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटीच्या अध्यक्षासह ११ जणांवर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात शुक्रवारी रात्री गुन्हा नोंद झाला.
हिंगोली येथे अनुराधा अर्बन को-ऑप क्रेडीट सो.लि. नावाची पतसंस्था आहे. या संस्थेच्या अध्यक्ष व संचालक मंडळाने २४ डिसेंबर २०१९ ते २६ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत ठेवीदारांना फिक्स डिपॉझीट व इतर गुंतवणुकीवर इतर संस्थेच्या तुलनेत जास्तीचे म्हणजेच १० ते १२ टक्के पर्यंत परतावा देण्याचे आमीष दाखविले. त्यामुळे ४०३८ ठेविदारांनी एकूण ६ कोटी २७ लाख ६५ हजार १३० रूपयांची रक्कम संस्थेच्या विविध प्रकारच्या ठेवीमध्ये गुंतवली होती.
मात्र ठेविदारांच्या रकमेचा अपहार करण्याच्या उद्देशाने आरोपीतांनी बनावट ठराव व बनावट कर्ज प्रकरणाची कागदपत्रे तयार करून व बनावट स्वाक्षऱ्या करून त्याआधारे संस्थेची मुदत ठेवीची रक्कम तारण कर्जाद्वारे परस्पर उचलली. रिइन्व्हेसमेंट डिपॉजीट लोन, एम.आय.एस. डिपॉझीट लोन, वाहन तारण कर्ज, कॅश क्रेडीट लोन, पर्सनल लोन, सोने तारण कर्ज व एजंट आर.डी. कर्जामध्ये गैरव्यवहार करून् तसेच परस्पर रोख रकमांची उचल केली. यात संस्थेतील एकूण ४०३८ ठेवीदारांच्या ६ कोटी २७ लाख ६५ हजार १३० रूपये जमा रक्कमेची आर्थिक फसवणूक केली.
या प्रकरणी अनिल पारप्पा बंधू (प्रमाणित लेखा परीक्षक) यांनी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून पतसंस्थेचे अध्यक्ष अशोक वामनराव कांबळे (रा. वाशिम ह.मु. तापडीया इस्टेट हिंगोली), सचिव मोहन मनीराम सोनटक्के (रा. वाशिम), संचालिका अनुराधा वामनराव कांबळे (रा. वाशिम ह.मु. तापडिया इस्टेट हिंगोली), सीमा अशोक कांबळे, (रा. वाशीम, ह.मु. तापडीया इस्टेट हिंगोली), बाजीराव माणिकराव शैकू (रा. हिंगोली), मनिषा मनोज डोळसकर उर्फ मनिषा सुभाष कल्याणकर (रा. हिंगोली), मोहम्मद साजीद अब्दूल खदीर (रा. हिंगोली), तेजस्वीता राजेंद्र शेगोकार (रा. वाशीम), व्यवस्थापक प्रदिप कृष्णराव पत्की ( रा. हिंगोली), पासिंग ऑफिसर मोतीराम चंपती जगताप (रा. भांडेगाव ता. हिंगोली), रोखपाल शुभम राजू घाटोळ (रा. हिंगोली) यांच्या विरुध्द गुन्हा नोंद झाला आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक एन. बी. काशिकर तपास करीत आहेत.