राजू उत्तमराव बेंगाळ (रा. बोरी शिकारी) हे हिंगोली येथील एका व्यापाऱ्याकडे मुनीम म्हणून काम पाहतात. २ सप्टेंबर रोजी त्यांनी बँकेतून २ लाख ८० हजार रुपयांची रक्कम काढली होती. रक्कम ठेवलेली पैशाची बॅग दुचाकीला अडकवून ते परत निघाले होते. त्यांची दुचाकी हिंगोली शहरातील खुराणा पेट्रोलपंप ते नगरपरिषद रोडवरील दुर्गा साडी सेंटर परिसरात आली असता, एकाने तुमचे पैसे पडले, असे सांगितले. त्यावरून राजू बेंगाळ हे दुचाकीवरून खाली उतरले. तेवढ्यात दुचाकीजवळ असलेल्या एकाने पैशाची बॅग लांबवित दुचाकीवरून फरार झाले. दरम्यान, सुरुवातीला या प्रकरणात दोन चोरटे असल्याचा संशय होता; मात्र नंतर यात चार चोरट्यांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी राजू बेंगाळ यांच्या फिर्यादीवरून चार अनोळखींविरुद्ध हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. दरम्यान, पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहायक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, पोलीस निरीक्षक पंडित कच्छवे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. तसेच सीसीटीव्ही फुटेजवरून काही हाती लागते का, याची चाचपणी केली. मात्र शुक्रवारी दुपारपर्यंत चोरट्यांबाबत धागेदोरे लागले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पैशाची बॅग लांबविणाऱ्या आरोपीत चौघांचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:35 IST