हिंगोली : होळी आणि धूलिवंदन सणांनिमित्त पिचकारी आणि रंगांची दुकाने थाटली असली तरी दुकानांवर ग्राहकच येईनात, असे छोट्या व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. एकंदर होळी व धूलिवंदन सणांच्या पूर्वसंध्येला होळी सणावर कोरोनाचे सावट दिसून आले.
होळी सण चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. शहरातील गांधी चौक, इंदिरा चौक, जवाहर रोड आदी गजबजलेल्या भागांमध्ये पिचकारी व रंगांची दुकाने मोठ्या प्रमाणात थाटली जातात. पण, यावेळेस कोरोना संसर्गामुळे दुकाने कमीच थाटली गेल्याचे पाहायला मिळाले.
२३ मार्च २०२० पासून कोरोनाचे संकट छोट्या व्यापाऱ्यांच्या आजूबाजूला घोंघावत आहे. याचा परिणाम थेट छोट्या व्यापा-यांवर होताना पाहायला मिळत आहे. गतवर्षीचा अनुभव लक्षात घेता छोट्या व्यावसायिकांनी नवीन रंग किंवा पिचकारी हा जास्तीचा माल खरेदी न करता जुनाच माल विक्रीसाठी ठेवला होता.
दुसरीकडे कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. हे लक्षात घेऊन नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करून सार्वजनिकरीत्या सण, उत्सव साजरे करू नये, अशा सूचना दिल्या आहेत.
होळी सणाला साखरगाठ्यांचा मान असतो. पण, गाठ्या खरेदीसाठी ग्राहकच येईनासे झाले आहेत. त्यामुळे दुकानांत बसून राहण्याची वेळ आली आहे. त्यात वेळेचे बंधन घातल्याने खरेदी-विक्रीवर परिणाम झाला आहे. होळीच्या पूर्वसंध्येला शहरातील बाजारपेठेत साखरगाठी १२० रुपये किलो, खोबरागाठी २४० रुपये किलो, बत्तासेगाठी १०० रुपये किलोने कमी प्रमाणातच विक्री झाली.
होळी सणाला गोवऱ्या एकावर एक रचून पेटवून देऊन पूजा करण्याची अनेक वर्षांची प्रथा आहे. गतवर्षीपासून गोवऱ्यांची विक्री होते, पण कोरोनामुळे विक्रीवर परिणाम झाल्याचे शिवराम अवघड यांनी सांगितले.
रंगांची उलाढाल कमीच
चार दिवसांपासून विविध रंगांची दुकाने वर्दळीच्या रस्त्यांवर शहरात थाटलेली शनिवारी पाहायला मिळाली. कोरोना रुग्णांची दिवसेंदिवस होत असलेली वाढ पाहून यावेळेस रंग खरेदी केले नाहीत. गतवर्षीच खरेदी केलेले रंग विक्रीसाठी ठेवले आहेत. जेवढी विकतील त्यातच समाधान मानायचे आहे. कोरोनामुळे ग्राहकही येईनासे झाले आहेत. होळी सण तोंडावर आला असताना ३०० च्या जवळपास रंगांची दिवसाकाठी विक्री होत असे. परंतु, यावेळेस कोरोनामुळे १०० रुपयेही पदरात पडले नाहीत.
शेख जब्बार, रंग विक्रेता
होळी सणानिमित्त विक्रीसाठी रचून ठेवलेल्या गोवऱ्या
फोटो नं. १४