हिंगोली : जो घोडा बसतो किंवा विसावा घेतो, तो घोडा नसतो, असे म्हणतात ते काही खोटे नाही. पण कोरोनाने घोड्यालाही आठ महिने घरी विसावा करायला भाग पाडले. त्यामुळे घोडे व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.
मार्च ते ऑक्टोबर या आठ महिन्यांत कोरोना महामारीने घोड्यालाही घरातच बसविले.
फेब्रुवारी व मार्च महिन्यात विवाह तिथी नाही. त्यामुळे घोडे व्यावसायिकांना आता एप्रिल महिन्याची वाट पहावी लागणार आहे. सद्य स्थितीत तरी घोडे व्यावसायिकांना घोडा पाळणे कठीण झाले आहे. परिणामी घोडे व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोना नियम पाळत काही ठिकाणी कार्यक्रमात घोड्याला काम मिळत आहे. परंतु, एक-दोन कामे मिळाल्याने पोट भरत नाही, असे घोडे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. सध्या तरी घोड्याला तबेल्यातच ठेवण्याची वेळ घोडे मालकांवर येऊन ठेपली आहे. सध्या शंभर रुपयेही पदरात पडत नसल्यामुळे लेकराबाळांना काय खाऊ घालावे, असा प्रश्न पडला आहे.
वरातीच्या घोड्याचा भाव सद्यस्थितीत ३ हजार ते ४ हजार असा आहे. जो की कोरोनाआधी २ हजार ५०० ते ३ हजार होता. कार्यक्रम छोटा असो किंवा मोठा, घोडे व्यावसायिक स्वत:बरोबरच घोड्यालाही मास्क घालत आहेत. पोटाची खळगी भरण्याचे साधन घोडा असल्याने घोडेमालक घोड्याची काळजी घेताना पाहायला मिळत आहेत.
जिल्हा प्रशासनाने अनुदान द्यावे
घोडा पाळणे सोपे नाही. सध्या महागाईने कळस गाठला आहे. त्यामुळे घोडा खाद्य घेणे परवडत नाही. पिढ्यानपिढ्या हा व्यवसाय असून, यावरच कुटुंबाचा गाडा चालतो. त्यामुळे प्रशासनाने घोडे व्यावसायिकांना आर्थिक मदत करावी, अशी विनंती बाबाभाई घोडेवाले (हिंगोली) व शेख सलमानभाई (हिंगोली) यांनी केली आहे.
असे आहेत विवाहमुहूर्त
फेब्रुवारी व मार्च महिन्यात विवाह मुहूर्त नाहीत. २४ एप्रिल ते ३० एप्रिल आणि १ मे व २ मे अशी विवाह मुहूर्त आहेत, अशी माहिती संतोषगुरू अगस्थी यांनी दिली.
फोटो