हिंगोली : कोरोनाचा वाढता संसर्ग पाहून जिल्ह्यात सहा ठिकाणी विलगीकरणाची स्थापना केली. परंतु, विलगीकरणाच्या बेजबाबदारपणामुळे पाॉझिटिव्ह अनेक जणांना भेटून मोकळा होत आहे.
जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण पाहून जिल्हा प्रशासनाच्या वतीने बसस्थानक, रेल्वेस्टेशन, अण्णा भाऊ साठे वाचनालय आणि जिल्हा रुग्णालयात अँटिजन तपासणी तसेच आरटीपीसीआर तपासणीची व्यवस्था केली आहे. बसस्थानक आणि रेल्वे स्टेशन येथे केवळ अँटिजन तपासणीच केली जाते. या ठिकाणी रुग्ण आढळल्यास जिल्हा रुग्णालय किंवा लिंबाळा येथील विलगीकरण केंद्रांना कळविले जाते. परंतु, विलगीकरण केंद्राला कळवूनही तास-दीड तास संबंधित अधिकारी गाडी घेऊन येत नाहीत. तोपर्यंत पाॉझिटिव्ह निघालेला व्यक्ती दहा ते बारा लोकांना कोरोना वाटत फिरतो हे कोणालाही कळत नाही. पाॉझिटिव्ह रुग्णास गंभीर आजार असेल तर त्यास जिल्हा रुग्णालयात पाठविले जाते तर साधारण असेल तर त्यास लिंबाळा येथे पाठविले जाते. गुरुवारी बसस्थानकात दोन ते तीन रुग्ण गाडीची वाट पाहत बसलेले दुपारच्या वेळी पहायला मिळाले.