हिंगोली : जिल्ह्यात २४ मार्च रोजी वादळी वारा, मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होऊन तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, अस अंदाज ‘वनामकृ’ विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी मौसम सेव विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतमालाची सुरक्षित ठिकाणी साठवण करावी, असे आवाहन केले आहे.
जिल्ह्यात गहू, हरभरा, ज्वारी आणि करडई या पिकांची लवकरात लवकर शेतकऱ्यांनी काढणी करुन सर्व पिके सुरक्षित ठिकाणी ठेवावे. जेणे करुन पिकांची नासाडी होणार नाही. पिकांचा ढीग केला असल्यास त्यास ताडपत्रीने झाकून ठेवावे. सध्या हळदीची काढणी, हळद उकडणे, वाळवणे, पॉलिश करणे ही कामे वेगाने सुरु आहेत.
वादळी वारा आणि पावसाची शक्यता लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी पशुधनाची काळजी घ्यावी. जनावरांच्या गोठ्याच्या छतावर उसाचे पाचट किंवा तुराट्या टाकाव्यात. जेणेकरुन पशुधनाला हानी पोहोचणार नाही. शेतकऱ्यांनी विजांचा कडकडाट सुरु असेल त्यावेळी झाडाच्या खाली उभे राहू नये. त्यामुळे जीवितास धोका होण्याची शक्यता असते.
जनावरांचा चारा घरातच ठेवावा
पावसात भिजलेला चारा जनावरे खाण्यास नकार देतात. तेव्हा शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील चारा हा पावसात भिजणार नाही, अशा ठिकाणी म्हणजे घरात ठेवावा. चारा भिजल्यास त्याची प्रत खालावून जाते.