तुरळक प्रमाणात लोकांना फुफ्फुसांचे आजार असल्याने अस्थमाचा त्रास होतो. मात्र मागील काही दिवसांपासून मुलांनाही धुळीमुळे किंवा व्हायरल इन्फेक्शनमुळेही श्वसन इंद्रियांचे आजार जडत असल्याचे दिसून येत आहे. अशांना ढगाळ वातावरण व हा थंडावा मानवत नाही. त्यामुळे त्यांनी बाहेर पडणे टाळले पाहिजे. तसे न केल्यास हा आजार बळावतो, असे दिसते. वृद्धांनाही या वातावरणाचा अनेकदा त्रास होतो. शिवाय ज्यांना मुळातच या आजाराचा त्रास आहे, अशांनीही या काळात काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे.
प्रतिकारशक्ती कमी
बहुतेक वेळा अस्थमासारखा आजार असलेल्यांची प्रतिकारशक्ती कमी असते. त्यांनी प्रोटीन व व्हिटॅमिनयुक्त आहार घेतला पाहिजे. शरीरात पाण्याचे प्रमाण मुबलक असावे. बाहेरचे तसेच थंड पदार्थ खाणेही टाळले पाहिजे. अन्यथा अस्थमाचा धोका होण्याची भीती असते.
बालकांमध्ये अस्थमा
सध्या लहान मुलांमध्ये व्हायरल इन्फेक्शन किंवा धुळीसारखी अॅलेर्जिक दम्याची लक्षणे जास्त दिसून येत आहेत. अशा मुलांना श्वसन इंद्रियांचे आजार जडत असल्याने थंड वातावरण, वातावरणातील आर्द्रता या काळात त्यांना त्याचा जास्त त्रास होतो, असे दिसून येते.
ही घ्या काळजी
अस्थमा असलेल्यांनी थंड वातावरणात फिरणे टाळावे. नियमित औषधी, इनहेलरचा वापर करावा. श्वसनाचे व्यायाम करावे. लहान मुलांना इन्फ्लुएंझा, न्यूमोकोकल ही लस देऊन न्यूमोनियासारख्या आजारापासून बचाव करणे शक्य आहे.
थंड वातावरणात काळजी घ्यावी
ढगाळ व थंड वातावरणात अस्थमा असलेल्या रुग्णांना त्रास जाणवतो. त्यांनी नियमित औषधोपचार, श्वसनाचे व्यायाम, प्रोटीन, व्हिटॅमिनयुक्त आहार सेवन केला पाहिजे. घरगुती उपाय म्हणून वाफ घ्यावी. हे सर्व केल्यास धोका टाळता येतो.
-डॉ. यशवंत पवार, जनरल फिजिशियन, हिंगोली