एका बोलेरो जीपमधून रेशनचा ५८ कट्टे गहू काळ्या बाजारात नेला जात असल्याची माहिती सेनगाव पोलिसांना मिळाली होती. त्यावरून सहायक पोलीस निरीक्षक दीक्षा लोकडे यांच्या पथकाने आजेगाव रोडवरील सुरूची हॉटेल परिसरात एमएच ३७ जे १८६८ क्रमांकाची बोलेरो जीप थांबवून तपासणी केली. यावेळी जीपमध्ये ४४ हजार ५४४ रूपये किमतीचे ५८ कट्टे गहू आढळून आला. या गव्हाचे वजन २७ क्विंटल ८४ किलाे भरले आहे. अधिक तपासणी केली असता हा गहू रेशनचा असल्याचे समोर आले. त्यावरून पोलिसांनी ६ लाख रूपये किमतीची बोलेरो जीप व ४४ हजार ५४४ रूपये किमतीचा रेशनचा गहू जप्त केला. याप्रकरणी सपोनि दीक्षा लोकडे यांच्या फिर्यादीवरून चालक व मालक शेख साजीद शेख मुस्ताक (रा. महात्मा फुले नगर, रिसाेड) याच्याविरुद्ध सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशावरून जप्त केलेला गहू व वाहन गोरेगाव ठाण्याचे पोलीस निरीक्षक दळवे यांच्या ताब्यात देण्यात आला आहे. तपास सपोनि दळवे करीत आहेत.
काळ्या बाजारात जाणारा रेशनचा गहू पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:33 IST