Hingoli Murder ( Marathi News ) : थोरल्या भावाने सख्ख्या लहान भावाचा खून करून मृतदेह शेतात पुरल्याची घटना सेनगाव तालुक्यातील शेगाव (खोडके) येथे १४ डिसेंबर रोजी उघडकीस आली. या घटनेने खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजी किशन खोडके (२३) हा १२ डिसेंबर रोजी शेतात गेला. तो रात्री उशिरापर्यंत परत आला नसल्याने त्याचा मोठा भाऊ हरिभाऊ किसन खोडके (२९) याने गोरेगाव पोलिस ठाण्यात १३ डिसेंबर रोजी शिवाजी हरवल्यासंबंधी तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी शोधमोहीम सुरू करीत शेगाव (खोडके) येथूनही सुगावा काढण्याचा प्रयत्न केला असता प्रकरण वेगळेच असल्याचे पुढे आले. सहायक पोलिस निरीक्षक विनोद झळके, सहायक पोलिस उपनिरीक्षक शेषराव राठोड, नितेश लेनगुळे, पोलिस अंमलदार अनिल भारती, विठ्ठल खोकले, विठ्ठल नवले, अमोल जाधव यांच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवीत शिवाजी खोडके याचा मोठा भाऊ हरिभाऊ किसन खोडके यास ठाण्यात बोलावून घेत चौकशी असता हरिभाऊने खुनाची कबुली दिली.
लहान भाऊ शिवाजी यास शेतात कामानिमित्त बोलावून घेत गळा दाबून खून केला. त्यानंतर शेतातच खड्डा खोदून मृतदेह पुरल्याचेही हरिभाऊने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी घटनास्थळ गाठत पुरलेला मृतदेह बाहेर काढला. अपर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली.