औंढा नागनाथ : नागरिकत्व कायद्यातील दुरुस्तीच्या विरोधात मुस्लिम बांधवांच्यावतीने सोमवारी बंद पुकारण्यात आला होता. सकाळी १०.४० वाजेदरम्यान काही आंदोलकांनी बस स्थानकात उभ्या बसवर दगडफेक केल्याने बंदला हिंसक वळण लागले.
नुक्तेच्या संसदेत दुरुस्ती करण्यात आलेल्या नागरिकत्व कायद्याची अंमलबजावणी करू नये या मागणीसाठी मुस्लीम समाजातर्फे सोमवारी शहर बंदचे आवाहन करण्यात आले होते. सकाळी १० वाजता बंदला समर्थन देण्यासाठी काही तरुणांनी शहरातून दुचाकी रॅली काढली. दरम्यान, रॅलीतील काही आंदोलकांनी बसस्थानकात जात तेथे उभ्या बसवर ( एम एच 06 एस 8805 ) दगडफेक केली. दगडफेकीत बसच्या मागच्या बाजूच्या काचा फुटल्या आहेत. यावेळी या गाडीत प्रवासी नसल्याने कुठलीही जीवितहानी झाली नाही. याची माहिती तात्काळ वाहतूक नियंत्रण गिरी यांनी पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंढे यांना दिली. त्यांनी पोलिस कर्मचाऱ्यांसह बसस्थानकाकडे धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. बंदला हिंसक वळण लागल्याने शहरातून पुढे जाणाऱ्या बस न सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे बसस्थानकामध्ये बाहेरून येणाऱ्या अनेक बस उभ्या असून प्रवाशांची गर्दी झाली आहे.