- मन्सूर अली वटकळी (जि. हिंगोली) : सेनगाव तालुक्यातील वटकळी येथे जलजीवन योजनेअंतर्गत करण्यात येत असलेले पाईपलाईन व इतर कामे निकृष्ट होत आहे, आरोप करत ग्रामस्थांनी बुधवारी पाण्याच्या टाकीवर चढून ‘शोले’ स्टाईल आंदोलन केले.
जलजीवन मिशनअंतर्गत दाताडा (खुर्द) शिवारात विहीर खोदली व त्या विहिरीवरून गावात पाईपलाईन करण्यात आली आहे. परंतु खोदलेल्या विहिरीला पाणी कमी लागले आहे. त्यामुळे गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच गावात केलेली पाईपलाईनही निकृष्ट करण्यात आली आहे, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. उन्हाळ्याच्या दिवसांतही गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अद्याप सुटला नाही, अशा विविध कारणांमुळे गावकऱ्यांनी २१ मे रोजी सकाळी साडेदहा वाजेदरम्यान गावातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीवर चढून ‘शोले’ स्टाईल आंदोलन केले.
अधिकाऱ्यांनी कामाची चौकशी करावी... जलजीवन योजनेअंतर्गत होत असलेले पाण्याच्या टाकीचे काम व नळ योजनेचे काम याबाबत अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष गावात येऊन चौकशी करावी. तसेच संबंधित गुत्तेदारावर कार्यवाही करावी अशी मागणी ही गावकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. या संदर्भात १९ मे रोजी गावकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले आहे.