लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : गोरेगाव परिसरातील केंद्रा रोडवर दुचाकी व कारचा २९ मे रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास अपघात झाला होता. यात तीन जखमी व एक ठार झाला होता. स्वत: कारचालक ठाण्यात हजर होऊनही पोलिसांनी मात्र तीन दिवसांनी ‘अज्ञात आरोपी’वर शनिवारी गुन्हा दाखल केला.अपघाताच्या दिवशी कारचालक स्वत: पोलीस ठाण्यात हजर झाला, त्याने झालेली सर्व हकीगत सांगितली होती. मात्र कोणी गुन्हा दाखल न केल्यामुळे पोलिसांनी दोन तास चालकाला बसवून ठेवत सरबराई करून सोडून दिले. कारचालकाचे नाव सुनील स्वामी (रा. येलदरी) असे आहे. तो हिंगोली येथील वीज कंपनीत आॅपरेटर असल्याची माहिती आहे. सेनगाव येथून कार गोरेगावकडे जात होती, तर दुचाकीवरील तिघे गोरेगाव येथून कडोळीकडे जात असताना हा विचित्र अपघात झाला. दुचाकी कारवर आदळून १५ फूट घासत गेली. यामध्ये दुचाकीवरील रमेश हिरामण सरोदे, रामू दीपक कवर (रा. कडोळी) तसेच गोरेगाव येथील गजानन प्रल्हाद खिल्लारी तिघे जखमी झाले होते. खिल्लारी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या प्रकरणात एकाच्या मृत्यूमुळे गुन्हा दाखल करण्यास विलंब झाला. शिवाय जखमीही इतरत्र हलविले असल्याने ते सोपस्कार पूर्ण करताना कोणी लक्ष दिले नाही. मात्र कारचालक ठाण्यात येऊन गेलेला असतानाही गोरेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करताना ‘अज्ञात आरोपी’ असे लिहिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.आरोपीचा पत्ता आमच्याकडे नसल्यामुळे आॅनलाईन तक्रार नोंदवितेवेळी संगणक लिंक स्वीकारत नव्हते, त्यामुळे आम्ही अज्ञात नावाने गुन्हा दाखल केला आहे, असे गोरेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक माधव कोरंटल्लू यांनी सांगितले.
आरोपी ठाण्यात पण गुन्हा ‘अज्ञात आरोपी’विरुद्ध !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 23:54 IST