सेनगाव (जि. हिंगोली) : तालुक्यातील खैरी घुमट येथील येलदरी जलाशयात बुडालेल्या तरुणाचा ४० तासांनंतर मंगळवारी सकाळी सात वाजेदरम्यान मृतदेह आढळला आला. याप्रकरणी सेनगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सेनगाव तालुक्यातील खैरी (घुमट) येथे श्री कानिफनाथांची यात्रा सुरु असून, यात्रेसाठी झरी (जि. परभणी) येथील सुंदर राजू कोकाटे व त्याचा मित्र पवन रामकिसन धोत्रे हे दोघेजण आले होते. यात्रा परिसराच्या लगत असलेल्या येलदरी धरणातील नदीपात्रात पोहण्यासाठी रविवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास हे दोघे गेले होते. तलावातून पवन रामकिशन धोत्रे (वय २०) हा परत आला. परंतु सुंदर राजू कोकाटे (वय २२) हा परत न आल्यामुळे त्या ठिकाणी जत्रेसाठी आलेल्या पालकांना सदर माहिती देण्यात आली. यानंतर पालकांनी पोलिस प्रशासनाला माहिती दिली. १० मार्च रोजी सकाळी पोलिस प्रशासन व अग्निशामक दलाचे जवान त्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी मुलाचा शोध घेतला. परंतु मुलाला शोधण्यात त्यांना अपयश आले.
पाण्यावर तरंगत होता मुलाचा मृतदेहप्रशासनाच्या दिरंगाईमुळे मुलाचा शोध लागला नाही. प्रशासनाने तातडीने दखल घेऊन मुलाचा शोध लावावा, अशी मागणी कुटुंबाने केली होती. ११ मार्च रोजी सकाळी सात वाजता सुंदर कोकाटे याचा मृतदेह पाण्यावर तरंगत असताना आढळून आला. मृतदेह बाहेर काढून कापडसिंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आला. यानंतर शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणी सेनगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.