हिंगोली : बंगळुरू (कर्नाटक) येथील जागतिक नेचर कंझर्व्हेशन फाउंडेशनने २२ ते २६ मार्च २०२५ असे पाच दिवस परभणी व हिंगोली जिल्ह्यांत सर्वेक्षण केले. यामध्ये परभणी १०४ व हिंगोली जिल्ह्यात ९३ अशा एकूण १९७ पक्ष्यांची पाहणी केली. या पाहणीतून दोन जिल्ह्यांतील ८१ पक्ष्यांची जागतिक ‘ई-बर्ड’ या ॲपवर नोंदणी केली.
बंगळुरू येथील पक्षी अभ्यासकांनी परभणी व हिंगोली या दोन जिल्ह्यांतील पाणथळ, गवताळ भाग, झाडांवर, वेलीवर, जमिनीवर आढळणाऱ्या विविध पक्ष्यांचा पाच दिवस अभ्यास केला. सेनगाव (जि. हिंगोली) तालुक्यातील येलदरी तलाव, जिंतूर (जि. परभणी) तालुक्यातील निवळी तलाव, तसेच हिंगोली व परभणी जिल्ह्यांतील छोटे, मोठे जलाशय आणि माळरान येथे भेटी देऊन पक्ष्यांचे सूक्ष्मपणे निरीक्षण केले.
पाच दिवस अभ्यास केल्यानंतर पक्षी अभ्यासकांनी त्या निरीक्षणातून दोन जिल्ह्यांमधून ८१ प्रकारच्या पक्ष्यांची ‘ई- बर्ड’ ॲपवर नोंद घेतली. यामध्ये पानकावळे, रंगीन करकोचा, राखी बगळा, मोठा बगळा, लहान बगळा, गाय बगळा, खंड्या, शेकाट्या, कवड्या धीवर, हळदी-कुंकू, साधा बदक, जांभळी पानकोंबडी, चक्रवाक बदक, तुतवार, भिंगरी, हुदहुद, भारद्वाज, वेडा राघू, शिंजीर, पाकोळी, कांड्या करकोचा, चमचा बदक, कुदळ्या, राजहंस अर्थातपट्ट कदंब, अडई बदक, पाणलावा, नदी सुरय, चिरक, टिटवी, दयाळ, शिंपी, चिमणी, चंडोल, कबुतरे, कावळे, पोपट आदी पक्ष्यांचा समावेश आहे. बंगळुरू येथील नेचर कंझर्व्हेशन फाउंडेशनचे पक्षी अभ्यासक समाक्षी तिवारी, के. शशांक, अनिल कुमार, तसेच पक्षीमित्र विजय ढाकणे, माणिक पुरी, अनिल उरटवाड, गणेश कुरा आदींचा या सर्वेक्षणात समावेश होता.
पक्ष्यांकरिता झाडे लावावीतपरभणी व हिंगोली जिल्ह्यांत विविध प्रकारचे पक्षी नेहमीच आढळून येतात. काही पक्षी हे हिमालय, सायबेरिया आणि ऑस्ट्रिया या देशांतून हिवाळा, पावसाळा आणि उन्हाळा या तिन्ही ऋतूत येत असतात. वातावरण बदलले की, हे पक्षी मायदेशी परत जाताना दिसतात. तेव्हा नागरिकांनी झाडे, वेली लावावीत. पक्षी संवर्धन आणि संरक्षण होण्याकरिता जिल्ह्यात पक्षी मित्र चळवळ वाढीस लागणे गरजेचे आहे, असे असे आवाहन पक्षीमित्र डॉ. गजानन धाडवे, माणिक पुरी, अनिल उरटवाड, गणेश कुरा आदींनी केले आहे.