केंद्र शासनाकडून क्रीडा विभागामार्फत शाळांसाठी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यासाठी शाळांच्या क्रीडा शिक्षकाची नोंद खेलो इंडिया या ॲपवर करायची आहे. मात्र, त्याला हिंगोली जिल्ह्यात अद्याप तरी फारसा प्रतिसाद दिसत नाही. खेलो इंडियाच्या ॲपवर पहिली ते बारावीच्या सर्व शाळांमधील शारीरिक शिक्षण विषयाच्या एका शिक्षकांनी आपली नोंदणी करायची आहे. शाळेत शारीरिक शिक्षण या विषयाचा शिक्षक उपलब्ध नसल्यास मुख्याध्यापक-प्राचार्यांनी या कामासाठी एका सहा. शिक्षकाची नियुक्ती करण्यास सांगण्यात आले आहे. एकशिक्षकी शाळेत शाळा नोंदणी व सहा. शिक्षक नोंदणी त्याच शाळेतील शिक्षकाने करावी, असेही सुचविले आहे. या कामासाठी नियुक्त सहा. शिक्षकाने आपल्या ॲन्ड्राॅईड फोनवर खेलो इंडिया स्कूल व्हर्जन हे ॲप डाऊनलोड करायचे आहे. मात्र, हिंगोली जिल्ह्यात अनेक शाळांनी अजून याला फाटा दिल्याचे दिसून येत आहे. कोरोनामुळे अनेक शाळा बंद असून त्यामुळे शिक्षकांना याची माहितीच नसल्याचेही दिसत आहे. अनेक शाळांमध्ये शारीरिक शिक्षणासाठी शिक्षकच नाही. अशा शाळांतील इतर कोणत्या शिक्षकावर ही जबाबदारी टाकायची, हे निश्चित होत नसल्याने घोडे अडल्याचेही दिसून येत आहे.
शारीरिक शिक्षणासाठी शिक्षकच प्रभारी
शारीरिक शिक्षणाकडे मागील काही वर्षांत दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. शाळांमधील हा तासच गायब झाला आहे. गुणवत्तावाढीसाठी विषयाचेच अधिक तास घेण्याच्या नादात यात दुर्लक्ष आहे. तर अनेक शाळांत प्रभारी शारीरिक शिक्षक या तासाकडे दुर्लक्ष करतात, असे दिसते.
शालेय शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांमधील क्रीडानैपुण्याचा विकासही तेवढाच महत्त्वाचा आहे. केंद्र शासनाने खेलो इंडिया उपक्रमातून याकडे लक्ष वेधले आहे. शाळांतील क्रीडा शिक्षकांची या ॲपवर जावून नोंदणी करायच्या सूचना आहेत, तशी नोंदणी होत आहे.
- कलीमोद्दीन फारुखी,
जिल्हा क्रीडा अधिकारी
खेलो इंडिया ॲपवर जिल्ह्यातील सर्व शाळांनी शारीरिक शिक्षकाची नोंद करणे गरजेचे आहे. २७ डिसेंबरपर्यंत यासाठी मुदत आहे. ज्या शाळांनी नोंदणी केली नाही, त्यांनी नोंदणी केल्यास भविष्यात याचा शाळांना फायदा होवू शकतो. यात मुख्याध्यापकांनी लक्ष घालावे.
- पी.बी. पावसे,
शिक्षणाधिकारी