झिंक - एक ‘मूक’ कमतरता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2020 07:40 AM2020-05-17T07:40:06+5:302020-05-17T07:40:58+5:30

एकीकडे जगभरातील डॉक्टर, वैज्ञानिक आणि संशोधक नोव्हेल कोरोना व्हायरसचा अद्याप अभ्यास करत असताना, हा प्रादुर्भाव नेमका कसा काम करतो आणि यावरील उपचारांच्या नवीन पर्यायांवर याबद्दल संशोधन करत असताना, दुसºया बाजूने माहितीचा विस्फोट होत आहे.

Zinc - a 'silent' deficiency | झिंक - एक ‘मूक’ कमतरता

झिंक - एक ‘मूक’ कमतरता

Next

- डॉ. शशांक आर. जोशी

झिंक हे सूक्ष्मपोषक रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यात अत्यंत उपयुक्त आहे आणि एका महत्त्वाच्या द्रव्याला अटकाव करून झिंक कोरोना विषाणूला रोखते, असेही अलीकडील अभ्यासातून पुढे आले आहे. गेल्या काही दशकांत नोंदवल्या गेलेल्या वैज्ञानिक पुराव्यात असे दिसून येते की, झिंकमधील इम्युनो-न्युट्रियंट (रोगप्रतिकारशक्तीला पोषक) गुणधर्मांमुळे विषाणूजन्य प्रादुर्भावांशी लढण्याची मानवी शरीराची शक्ती वाढते. यामध्ये मानवी श्वसनमार्गाला होणाऱ्या प्रादुर्भावांचाही समावेश आहे.

एकीकडे जगभरातील डॉक्टर, वैज्ञानिक आणि संशोधक नोव्हेल कोरोना व्हायरसचा अद्याप अभ्यास करत असताना, हा प्रादुर्भाव नेमका कसा काम करतो आणि यावरील उपचारांच्या नवीन पर्यायांवर याबद्दल संशोधन करत असताना, दुसºया बाजूने माहितीचा विस्फोट होत आहे. यातील बरीच माहिती परस्परविरोधी स्वरूपाचीही आहे. रोगप्रतिकार यंत्रणा दमदार असेल, तर विषाणूची लागण झाल्यास त्याच्याशी लढा देण्याची क्षमता वाढते, यावर मात्र सर्व डॉक्टरांमध्ये एकमत आहे.
‘इनअ‍ॅडिक्वेट झिंक इंटेक इन इंडिया : पास्ट, प्रेझेंट अ‍ॅण्ड फ्युचर’ या हार्वर्ड टी.एच. चॅन स्कूल आॅफ पब्लिक हेल्थने केलेल्या अभ्यासानुसार, भारतात झिंकच्या अपुºया सेवनाचे प्रमाण वर्षानुवर्षे वाढतच गेले आहे आणि त्यामुळे कोट्यवधी लोकांमध्ये झिंकची कमतरता आहे. परिणामी कुपोषणाची समस्या वाढत आहे. झिंकची सर्वाधिक कमतरता भारतात तांदूळ हे प्रमुख अन्न असलेल्या दाक्षिणात्य व ईशान्येकडील राज्यांमध्ये आहे. यात केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, मणिपूर, मेघालयाचा समावेश होतो. तात्पर्य, भारतीयांसाठी झिंक घेणे महत्त्वाचे आहे.
कोरोना व्हायरस हा थंड परिस्थितीत वाढणारा जुनाट विषाणू असून ३०-४० टक्के जणांना झालेली सर्दी या विषाणूमुळे झालेली असते, असे यूकेतील कॉमन कोल्ड युनिटमध्ये १९६४ मध्ये दिसून आले. एकंदर, सर्दीवरील उपचारांसाठी झिंकवर गेल्या ४० वर्षांहून अधिक काळ संशोधन सुरू आहे. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून झिंक घेणाºया व्यक्तीमध्ये सर्दी होण्याचे प्रमाण एक तृतीयांशाने कमी आहे. म्हणजेच, झिंकचे गुणधर्म सर्दीची तीव्रता व कालावधी कमी करण्यात उपयुक्त आहेत. झिंक हा आवश्यक क्षार असून, आपले शरीर तो स्वत:हून तयार करू शकत नाही. त्यामुळे आपला आहार अन्य पोषकांसोबत झिंकने समृद्ध असायला हवा.
झिंकची कमतरता ही जगात मोठ्या प्रमाणात आढळणारी पोषणात्मक कमतरता आहे. रोगप्रतिकार यंत्रणेतील पेशींच्या विकासासाठी व संवादासाठी झिंकची आवश्यकता भासते आणि दाहाला प्रतिसाद देण्याच्या प्रक्रियेत ते महत्त्वाची भूमिका बजावते. झिंक पुरेसे घेतल्यास कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाविरोधात अतिरिक्त रोगप्रतिकारशक्तीसाठी ते उपयुक्त ठरू शकते. सध्या रोगप्रतिकार यंत्रणा सशक्त राखणे आणि जीवनशैली निरोगी ठेवणे, ही काळाची गरज आहे.
सामान्य उपचार देण्यापूर्वी कोविड-१९ रुग्णांच्या पोषणविषयक स्थितीचे मूल्यमापन आवश्यक आहे. कारण, अपुºया पोषणामुळे प्रतिकारशक्तीचा प्रतिसाद कमकुवत झालेला असतो. आपली रोगप्रतिकारशक्ती बळकट केली पाहिजे. कोणत्याही प्रकारच्या फ्लूविरोधात आपली रोगप्रतिकारशक्ती भक्कम करणे आजपर्यंत कधीही वाटले नव्हते, एवढे महत्त्वाचे झाले आहे. समतोल आहार व मुख्य तसेच सूक्ष्मपोषकांकडे विशेष लक्ष देणे, हा जोमदार रोगप्रतिकार यंत्रणा बांधण्याचा पाया आहे. जेवणात जीवनसत्त्वे, क्षार व कर्बोदके योग्य प्रमाणात असली पाहिजेत. झिंकचे सेवन योग्य प्रमाणातच केले पाहिजे. कारण, झिंकच्या ओव्हर डोसमुळे अपचन, डोकेदुखी आणि मळमळीसारखे त्रास होऊ शकतात.
(लेखक इंडियन कॉलेज आॅफ फिजिशिअन्सचे डीन आहेत.)

Web Title: Zinc - a 'silent' deficiency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.