डॉ. शुभांगी पारकर, ज्येष्ठ मानसोपचार तज्ञ
दहशतवाद हा फक्त जीवितहानी किंवा मालमत्तेची नासधूस यापुरता मर्यादित नसतो. त्याचा सर्वात खोल परिणाम माणसाच्या मनावर होतो. लोकांमध्ये भीती निर्माण करणे, असुरक्षितता पसरवणे, मानसिक समतोल बिघडवणे हेच दहशतवादाचे प्रमुख उद्दिष्ट. त्यामुळे त्याचा परिणाम पीडितांवरच नाही, तर समाजातील अनेक थरांवर दीर्घकाळ जाणवतो.
दहशतवादी हल्ल्यासारख्या घटनेतील प्रत्यक्षदर्शी, बचावलेले लोक किंवा मृतांचे नातेवाईक यांच्यावर तीव्र मानसिक परिणाम होऊ शकतात. काही लोक गोंधळलेले वाटतात, लक्ष केंद्रित करणे कठीण जाते, आठवणीत गडबड होते किंवा विचार नीट करता येत नाही. काहींना थकवा येतो, झोप येत नाही किंवा शरीरात सतत ताण जाणवतो. चिंता, नैराश्य, अपराधीपणा, राग किंवा वास्तव नाकारण्यासारख्या भावना येऊ शकतात. यासोबतच काही लोक एकटे राह लागतात, उदास आणि निष्क्रिय होतात, व्यसनांकडे वळतात किंवा रागीट वर्तन करू लागतात. या लोकांमध्ये पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर (PTSD) दिसून येतो, ज्यामध्ये त्या घटनेचे सतत स्वप्न पडणे, आठवणींनी त्रस्त होणे, भीतीने गोंधळून जाणे आणि सतत सावध राहण्याची प्रवृत्ती दिसते.
काही लोकांना मानसिक धक्का बसतो. वारंवार अशा बातम्या पाहणे, ऐकणे किंवा सोशल मीडियावर दिसणारी घायाळ दृश्य भावनिक ट्रॉमा निर्माण करू शकते. त्यातून झोप न लागणे, अस्वस्थता आणि कोणतीही हिंसक घटना होईल, अशी भीती वाटते. अशा घटनांमुळे सामाजिक सलोखा बिघडू शकतो. घटनेचे आरोपी विशिष्ट धर्माशी, समुदायाशी जोडले गेले, तर समाजात संशय, द्वेष वाढतो. घृणास्पद भावना, वांशिक तणाव आणि विभाजनवादी वृत्ती जन्म घेते.
अशा स्थितीत काय करावे?
मानसिक आघात झालेल्यांना समजून घेणे, सुरक्षिततेची भावना, भावनिक आधार देणे अत्यंत गरजेचे असते. अशा वेळी समुपदेशन, थेरपी, कधी कधी औषधोपचार आवश्यक ठरतो. कुटुंब, मित्र आणि समाजाने त्यांना आधार देणे, त्यांच्याशी संयमाने वागणे महत्त्वाचे आहे. ध्यान, योग, प्रार्थना यांसारख्या उपायांनीही मानसिक स्थैर्य मिळू शकते.