मंकीपॉक्स आणि झिकाचा धोका अजून कमी झालेला नसतानाच आणखी एका व्हायरसने चिंता वाढवली आहे. ओरोपोच असं या व्हायरसचं नाव आहे, ज्याला स्लॉथ फिव्हर असंही म्हणतात. काही अमेरिकन लोकांमध्ये हा आढळून आला आहे. डॉक्टर सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देत आहेत. डेली मेलच्या रिपोर्टनुसार, बार्बाडोसमध्ये या व्हायरस प्रकरणं नोंदवली गेली आहेत. डॉक्टरांनी लोकांना पूर्ण कपडे घालण्याचा सल्ला दिला आहे.
ओरोपोच व्हायरस म्हणजे काय आणि तो कसा पसरतो?
ओरोपोच हे एक व्हायरल इन्फेक्शन आहे, जे डासांच्या चाव्यामुळे पसरतं. ओरोपोच व्हायरसमुळे ताप आणि अंगदुखी यांसारखी फ्लूची लक्षणं दिसून येतात. बहुतेक लोकांना यामुळे कोणत्याही गंभीर समस्या येत नाहीत, परंतु काही प्रकरणांमध्ये यामुळे मेंदूमध्ये सूज येऊ शकते. संसर्ग झाल्यानंतर ३-१० दिवसांत संक्रमित व्यक्तीमध्ये लक्षणे दिसू लागतात.
ओरोपोचची लक्षणं
- ताप येणे
- डोकेदुखी आणि अंगदुखी
- थकवा आणि अशक्तपणा
- स्नायू आणि सांधेदुखी
- मळमळ आणि उलट्या
- चक्कर येणे
ओरोपोचचा धोका
ओरोपोच व्हायरसमुळे मेंदूला सूज येऊ शकते. तसेच गर्भवती महिलांना याची लागण झाल्यास मुलांना जन्मजात आजार होऊ शकतात. यावर सध्या कोणतंही औषध नाही. त्यामुळे काळजी घेण्याची जास्त गरज आहे.