- माधुरी पेठकरखाण्याच्या आधी केवळ पदार्थाच्या वासानेच तोंडाला पाणी सुटतं. खाण्याच्या आस्वादात पदार्थाच्या चवीसोबतच पदार्थाचा वास हा महत्त्वाची भूमिका बजावत असतो.समजा खाण्याच्या पदार्थांना वासच आला नसता तर आपण खाणं एन्जॉयच करू शकलो नसतो. पण आता वैद्यक शास्त्रातला नवा अभ्यास वजन वाढण्याच्या समस्येत पदार्थांचा वास महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं सांगतो.अमेरिकेतल्या बर्कलेमधील ‘युनिव्हर्सिटी आॅफ कॅलिफोर्निया’ विद्यापीठातील संशोधकांनी यासंबंधीचा अभ्यास केला. वजन वाढवण्यात फक्त पदार्थांमधील कॅलरीजचाच हात नसतो तर पदार्थांचा वासही कारणीभूत ठरतो. हा पदार्थांचा वास कॅलरीज बर्न करण्याच्या प्रक्रियेवर परिणाम करतो असं या संशोधकांचं म्हणणं आहे. या संशोधकांनी आपल्या संशोधनासाठी उंदरांचा उपयोग केला. त्यांनी त्यासाठी चांगली जाडजूड उंदरं निवडली. त्यांना असं आढळलं की ज्या उंदरांना पदार्थांचा वास घेता येत नाही त्यांचं वजन वास घेवू शकणार्या उंदरांच्या तुलनेत झपाट्यानं कमी झालं. ज्या उंदरांना पदार्थांचा वास घेता येत होता त्यांचं वजन संशोधकांना वास न घेवू शकणार्या उंदरांच्या तुलनेत वाढलेलंही आढळलं.
या संशोधनातून संशोधकांना एका गोष्टीवर विश्वास बसला की वास येण्याच्या प्रक्रियेमुळे कॅलरीज शरीरात साठून राहतात त्या जळत नाहीत आणि तेच कारण आहे ज्यामुळे वजन वाढतं.या संदर्भातलं हे पहिलं संशोधन आहे. हा अभ्यास करताना संशोधकांन एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली की जर घाणेंद्रियांवर आणखी खोल काम केलं तर मेंदू ऊर्जा कशी साठवतो, कशी वापरतो आणि तो शरीरात ऊर्जेचं संतुलन कसं राखतो याचं नीट आकलन होवू शकेल.संशोधकांच्या या अभ्यासाचा उपयोग वयोमानानुसार भूक मंदावण्याच्या समस्येत, किंवा अपघात किंवा पार्किन्सन सारख्या आजरात निर्माण होणार्या खाण्याच्या समस्येत उपाय शोधण्यासाठी होवू शकतो. तसेच वजन कमी करणार्यानाही पुढे जावून या संशोधनाचा उपयोग होवू शकतो.संवेदनक्षमतेचा मोठा परिणाम चयापचय क्रियेवर होत असतो. त्यामुळे वजन वाढण्याचा संबंध फक्त न फक्त कॅलरींशी लावणं चुकीचं आहे. या कॅलरीज शरीरात साठून राहण्याची वास येण्यासारखी कारणंही आहेत त्यांचाही विचार या प्रकारच्या समस्येत करणं गरजेचं आहे.या संशोधकांच्या मते या संशोधनाचा आधार घेत असं एखादं औषध शोधून काढायला हवं जे औषध वास घेण्याच्या क्रियेत ढवळाढवळ न करता वासाचा चयापचय क्रियेशी असलेला संबंध तोडेल. असं झालं तर ती नक्कीच आश्चर्याची गोष्ट असेल.या अभ्यासाचा आधार घेत संशोधक पुढे जावून असं औषध तयार करतीलही कदाचित. पण तोपर्यंत वजन वाढण्याच्या अनेक कारणांमध्ये पदार्थांचा वास हे हे ही एक कारण असतं हे तर समजलं.