​नमिता कोहोक यांचा कॅन्सर पीडित ते 'मिसेस ग्लोबल युनायटेड २०१७' पर्यंतचा प्रवास थक्क करणारा !

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2017 08:26 AM2017-07-27T08:26:41+5:302017-07-27T15:03:03+5:30

त्यांचा हा प्रवास थक्क करणारा असून इतर कॅन्सर पीडितांसाठी एक प्रेरणादायी ठरू शकतो.

Namita Kohok's cancer survivor, she misses the journey to 'Mrs Global United United 2017'! | ​नमिता कोहोक यांचा कॅन्सर पीडित ते 'मिसेस ग्लोबल युनायटेड २०१७' पर्यंतचा प्रवास थक्क करणारा !

​नमिता कोहोक यांचा कॅन्सर पीडित ते 'मिसेस ग्लोबल युनायटेड २०१७' पर्यंतचा प्रवास थक्क करणारा !

googlenewsNext
ong>-रवींद्र मोरे 
नाशिक येथील नमिता कोहोक यांनी नुकताच अमेरिकेतील, ‘मिसेस ग्लोबल युनायटेड २०१७’ हा किताब जिंकला आहे. विशेष म्हणजे हा सन्मान मिळालेल्या नमिता या पहिल्याच भारतीय महिला ठरल्या आहेत. यशस्वी  उद्योजिका, मोटिव्हेशनल स्पिकर आणि कॅन्सरपीडितांसाठी काम करणाऱ्या नमिता या स्वत: कॅन्सरला पराभूत करून आपले जीवन अगदी आनंदात जगत आहेत. 



नमिता यांचा स्वत: कॅन्सर पीडित ते 'मिसेस ग्लोबल युनायटेड २०१७' पर्यंतचा प्रवास थक्क करणारा असून इतर कॅन्सर पीडितांसाठी एक प्रेरणादायी ठरू शकतो. यामुळेच त्या जगभरातील कॅन्सरग्रस्तांसाठी काम करणार असून या पुरस्काराच्या माध्यमातून त्यांना ही काम करण्याची संधी मिळाली आहे.
त्यांनी हा प्रवास अतिशय धैर्याने पार केला असून त्यासाठी त्यांना कुटुंबाचा कणखर पाठिंबा मिळाला आहे. नमिता यांच्या कॅन्सरविरोधातील याच लढ्याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत.

नमिता कोहोक यांना खूप काम करणे आवडत असून त्यांना कामात सर्वात जास्त आनंद मिळतो. त्या उत्तम शैक्षणिक सल्लागार असून यशस्वी उद्योजिकादेखील आहेत. त्यांचे जीवन अतिशय सुंदर असून याचे श्रेय त्या त्यांचे आई, वडील आणि पतीला देतात. त्यांच्या आयुष्यात वयाच्या ३३ पर्यंत अत्यंत सुरळीत सुरु होते. २०१४ च्या त्यांच्या अ‍ॅनिव्हर्सरीची सर्वजण अतिशय आतुरतेने वाट पाहत होते. विशेष म्हणजे ते त्यांची अ‍ॅनिव्हर्सरी वेगळ्या पद्धतीने म्हणजे दरवर्षी ते या दिवशी संपूर्ण वैद्यकीय तपासणी करुन साजरी करतात. संपूर्ण आयुष्य निरोगी जगावं हा त्यामागचा उद्देश. मात्र या उद्देशाला नियतीने छेद केला. 



सहजीवनाची १५ वर्ष पूर्ण केलले हे आनंदी कपल जेव्हा चेकअपसाठी गेले, तेव्हा त्यांना डॉक्टरच्या चेहऱ्यावर आनंदा ऐवजी वेगळीच चिंता दिसली. अधुन मधून नमिता यांच्या पोटात प्रचंड दुखायचे मात्र ते फारसे गंभीर नसावे असे त्यांना वाटत होते. त्या चेकअप नंतर डॉक्टरांनी त्यांना अजून एक टेस्ट करून घ्यायला सांगितली. जेव्हा टेस्टचे रिपोर्ट्स आले, तेव्हा डॉक्टरांनी दोघांना बोलावले. डॉक्टर काय सांगतील याची काळजी दोघांनाही वाटत होती. 



डॉक्टरांनी जेव्हा त्यांना वैद्यकिय अहवाल सांगीतला, तेव्हा नमिता यांना शरीरातून प्राण निघाल्यासारखेच वाटले. डॉक्टरांनी त्यांना हळूच सांगितले, नमिता तुम्हाला पहिल्या स्टेजचा ‘कोलोन कॅन्सर’ (पोटाचा कॅन्सर) आहे. हा शब्द ऐकताच नमिता यांचा काही वेळ श्वासच थांबला. एका क्षणात सर्व होत्याचे नव्हते झाल्यासारखे वाटले. त्यांची स्वप्ने, ध्येय, त्यांच्या इच्छा, जगभरात फिरण्याचा मानस सर्वकाही राहून जाणार असे वाटले. या विचाराने त्यांचे संपूर्ण जगच बदलून गेल्यासारखे वाटले. विशेष म्हणजे त्यांच्या कुटुंबात कधीही कोणालाही कॅन्सर झालेला नव्हता. पण त्यांना कॅन्सर डिटेक्ट झाला हे सत्य पचवायला त्यांना अनेक महिने लागले. 



अशा घटनेने बहुतांश लोक नैराश्येच्या वाटेला जातात. मात्र त्यांचे आई, वडील, पती, सासू यांनी त्यांना मोठ्या धैर्याने साथ दिली आणि त्यांना नैराश्य येऊ दिले नाही. शिवाय त्यांना डॉक्टरांनीही खूप सहकार्य केले. त्यांच्यामुळेच त्यांना कॅन्सरविरोधात लढा देण्याची प्रेरणा मिळाली, असे ते म्हणतात. डॉक्टरांनी उपचाराबरोबर त्यांना मानसिकदृष्ट्या सबळ बनवण्यासाठी आणि सकारात्मक राहण्यासाठीही प्रचंड मदत केली. त्यामुळेच त्यांनी अडचणींवर मात करत संकटांना संधीत रुपांतरीत केले असल्याचेही त्या सांगतात.  



पहिल्या केमो थेरपीच्यावेळी त्या खूप अशक्त होत्या. त्यामुळे डॉक्टरांना अनेक प्रयत्नांनंतरही हाताची व्हेन सापडत नव्हती. त्यावेळी त्यांनी मांडीच्या व्हेनचा पर्याय शोधला. त्यावेळी त्यांनी प्रचंड वेदनाही सहन केल्या. त्यांनी सुमारे ११ केमो सेशन केले. त्यामुळे त्यांचे केस गेले, त्वचेला खूप खाज यायची. डार्क सर्कल्स आले होते. पण तरीही त्यांनी अखेरपर्यंत हार मानली नाही. आणि सवार्तून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत राहिले. 

त्यांच्या सारख्या कॅन्सरग्रस्तांना त्यांनी एक सल्ला दिला आहे, ‘जेव्हा तुम्हाला हे समजेल, तेव्हा तुम्ही मीच का? हा प्रश्न करण्याऐवजी सकारात्मक राहून आपण नक्की बरे होणार हा, विचार मनात ठेवा.’  

कोलोन कॅन्सरची लक्षणे 
* डायरिया हे कोलोन कॅन्सरचे प्रमुख लक्षण आहे
* दिर्घकाळापासून कॉन्सटिपेशन म्हणजे मलावरोध असेल तर कोलोन कॅन्सर होण्याची शक्यता वाढते.   
* मल (विष्ठा)मध्ये रक्त येणे 
* मल विसर्जन होताना अडथळा येणे, पोट पुर्णत: साफ न होणे 
* विनाकारण शरीरात रक्ताची कमी होणे  
* अपचनाचा त्रास होणे 
* सातत्याने वजनात घट होणे
* पोटाच्या खालच्या बाजूला दिर्घकाळापासून वेदना होणे 
* नेहमी थकवा जाणवणे 
* सतत उलटी होणे 


- कोणाला होऊ शकतो कोलोन कॅन्सर 
* २० पैकी एका व्यक्तीस कोलोन कॅन्सर होण्याचा धोका असतो.
* जसजसे वय वाढते तसा हा कॅन्सर होण्याचा धोका वाढतो. 
* विशेष म्हणजे या प्रकारचा कॅन्सर होण्याचा धोका प्रत्येक व्यक्तीस असतो.  
* जर वयाच्या ५० वर्षाच्या आत याचे निदान झाले तर त्यावर उपचार शक्य आहे.  
* जर घरात कुणाला हा कॅन्सर असेल तर याचा धोका अजून वाढतो.  
* धुम्रपान आणि अल्कोहोल सेवन करणाऱ्यांना कोलोन कॅन्सर होण्याचा धोका अधिक असतो. 


Web Title: Namita Kohok's cancer survivor, she misses the journey to 'Mrs Global United United 2017'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.