Anti Pregnancy Pill for Men News: गर्भधारणा टाळण्यासाठी वेगवेगळे पर्याय अवलंबले जातात. बऱ्याचदा चुका होऊन गर्भधारणा होण्याची शक्यता असते. त्यासाठीची गोळी बाजारात आहे. त्याच स्वरुपात आता पुरुषांसाठीही गर्भधारणा टाळण्यासाठी गोळी तयार करण्यात आली आहे. या गोळीच्या चाचण्या सुरू असून, प्राथमिक चाचणीमध्ये गोळीचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहे. आता गोळीच्या पुढेही काही चाचण्या केल्या जाणार आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
हार्मोन मुक्त पुरुष गर्भनिरोधक गोळीची १६ पुरुषांवर चाचणी करण्यात आली. ही गोळी शरीरात योग्य पातळीपर्यंत पोहोचते का? या गोळीमुळे काही गंभीर दुष्पपरिणाम उद्भवू शकतात का? जसे ह्रदयाचे ठोके वाढणे, हार्मोनची पातळी, सूज येणे किंवा शरीरसंबंधांच्या भावना उत्पन्न होणे आदी गोष्टींबद्दल जाणून घेण्यासाठी प्राथमिक चाचणी करण्यात आली होती.
पुरूष गर्भनिरोधक गोळी : प्राथमिक चाचणीचे निष्कर्ष काय?
प्राथमिक चाचणीमध्ये ज्या लोकांना ही गोळी दिली गेली, त्यांच्या शरीरावर कोणताही दुष्परिणाम दिसून आला नाही. त्यानंतर आता व्यापक स्वरुपात या गोळीची चाचणी केली जाणार आहे.
२२ जुलै रोजी जर्नल कम्युनिकेशन्स मेडिसिनमध्ये याबद्दल लेख प्रसिद्ध झाला आहे. प्राथमिक चाचणीच्या निष्कर्ष या लेखातून मांडण्यात आले आहेत. प्राथमिक चाचणीमध्ये गोळीचे परिणाम चांगले दिसून आल्याने याला मंजुरी मिळण्याच्या दिशेने हे पहिले पाऊल मानले जात आहे.
वॉशिंग्टन विद्यापीठाच्या स्कूल ऑफ मेडिसिनच्या एंडोक्रिनॉलॉजिस्ट डॉ. स्टेफनी पेज यांनी सांगितले की, आपल्याला पुरुषांसाठी गर्भ धारणा टाळणाऱ्या जास्त गोष्टींची गरज आहे. ही गोळी शरीरात गेल्यानंतर शुक्राणू निर्मिती थांबवण्याचे काम करते.
ही गोळी शरीरात गेल्यानंतर रेटिनोईक अॅसिड रिसेप्टर अल्फा नावाचे प्रोटीन रोखण्याचे काम करते. हे प्रोटीन शुक्राणू निर्मिती आणि त्यांच्या वाढीमध्ये महत्त्वपूर्ण असते. पुरुषाच्या वृषणामधील एक Key व्हिटॅमिन ए मेटाबोलाईटमुळे सक्रीय होते. ही गोळी त्या Key ला सक्रीय होण्यापासून रोखते. त्यानंतर शुक्राणू निर्मितीची प्रक्रियाही रोखली जाते.
शुक्राणू निर्मिती किती काळासाठी थांबते?
या गोळीचे सुरुवातीचे परिक्षण नर उंदिरावर करण्यात आले होते. उंदिराच्या संभोगनंतर गर्भधारणा रोखण्यात ही गोळी ९९ टक्के परिणामकारक असल्याचे दिसून आले. या गोळीने थांबलेली प्रजनन क्षमता चार ते सहा आठवड्यानंतर पुन्हा सुरू झाली, असेही या संशोधनातून समोर आले.