- डॉ. नितीन पाटणकर (मधुमेहतज्ज्ञ)
मी मोर्चा नेला नाही... मी संपही केला नाही, मी निषेधसुद्धा साधा कधी नोंदवलेला नाही. मज जन्म फळाचा मिळता, मी केळे झालो असतो, मी असतो जर का भाजी तर भेंडी झालो असतो.
संदीप खरेंची ही एक कविता आहे, त्यात भेंडीचा उल्लेख वाचून भेंडीबद्दल काय कल्पना होते? अनेकांच्या तोंडून ‘अगदी सपक, जशी भेंडीची भाजी’ असेही उल्लेख अनेकदा येतात. शिव्या देण्यात माहीर असलेल्यांच्या दृष्टीनेपण कुणाला ‘भेंडी’ म्हणणे ही अगदी के.जी.मधली शिवी.खवय्यांच्या यादीत ‘भेंडी’ हा अगदी काहीच मिळत नाही किंवा काहीच पचत नाही, तेव्हा खाण्याचा पदार्थ. शाळेत असताना भेंडी देठापासून थोडी खाली कापायची आणि तो तुकडा रंगात बुडवून कागदावर चित्र काढायचे, इतकाच भेंडीशी संबंध. पुढे डायबेटीसवर उपचार करताना लक्षात आलेली गोष्ट म्हणजे अनेक जण असे असतात, ज्यांनी आयुष्यात कधीही भेंडी खाल्लेली नसते.
शाळा, कॉलेजात असताना आमची हॉटेलमध्ये जाण्याची उच्चतम पातळी म्हणजे सायनच्या गुरुकृपा हॉटेलात बसून सामोसा खाणे. पंचतारांकित हॉटेलात जायचा प्रसंग फार नंतर आला. एका मित्राने ताजमध्ये जेवायला बोलावले. तिथे त्याने सांगितले, तिथल्या एका रेस्टॉरंट (हाच उच्चार स्पष्ट आहे, शिष्ट लोक याला रेस्त्रॉ वगैरे काहीही म्हणोत) तर रेस्टॉरंटमध्ये ‘ओक्रा’ खूप छान मिळतो. माझं सगळं शिक्षण मराठीमध्ये, इंग्रजी शब्दांची जुजबी माहिती. मला तर ओक्रा नावाचा पदार्थ खायचा हे ऐकूनच कसेसे होत होते. गावाला एसटी बसने कोकणात जाताना शेजारी कुणी ओक्रा न येवो, अशी प्रार्थना असायची. यथावकाश तो दिव्य पदार्थ समोर आला. समोर बघतो तो भेंडी. हत्तेच्चा (याचा अर्थ आणि उच्चार नक्की काय हे कुणी सांगेल का) ही तर भेंडी, असे उद्गार तोंडातून बाहेर पडेल. ‘लेंटिल सूप’ या फेमस पदार्थाची तशीच ओळख झाली.
अतिपरिचयात अवज्ञा म्हणतात, तसे भेंडीच्या बाबतीत झाले आहे. ‘थकवा येणे’ या गोष्टीसाठी टॉनिक, विटॅमिन्स अशा अनेक गोष्टी दिल्या जातात, ज्यांचा फार काही उपयोग होत नाही. भेंडी खाण्यात आल्याने थकवा पटकन दूर होतो. खासकरून ‘ताकातले भेंडे’ या नावाचा खास पदार्थ खाल्ल्याने.
तसेच व्हायरसमुळे, रसायनांच्या सेवनाने किंवा दारूमुळे लिव्हरला जी इजा पोहोचते, ती टाळण्यासाठी भेंडी हे उपयुक्त अन्न आहे. याचा अर्थ उद्यापासून दारू पीतपीत भेंडीची भाजी खाल्ली तर लिव्हरला काहीच होणार नाही, असे कुणीही कृपया समजू नये. मधुमेह, ब्रेस्ट कॅन्सर अशा रोगांवरही भेंडी हे औषधांच्या बरोबरीने उपयोगी पडते. हे सर्व फायदे मिळवण्यासाठी भेंडी खायला हवी. ती खाल्ली जाण्यासाठी तिचा गिळगिळीतपणा, चिकटपणा आणि तार सुटण्याच्या स्वभावावर मात करून चविष्ट भेंडी बनवता यायला हवी.