वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय तुम्हाला सांगितले जात असतील. कुणी सांगतं डाएट करा, कुणी सांगतं एक्सरसाइज करा, कुणी सांगतं अमका आहार घ्या, टमका आहार घ्या. पण काही केल्या वजन कमी होत नाही. तुम्हाला खरंच वजन कमी करायचं असेल तर तुमच्या लाइफस्टाइलमध्ये सुधारणे करणे गरजेचे आहे. कामाच्या व्यस्ततेमुळे हे करणं कठिण आहे. पण तुम्ही कधी आणि काय खावं याची काळजी घ्या.
जास्तीत लोकांच्या जेवणाची वेळ कधी फिक्स नसते. इथेच सगळं चुकतं. तुम्हाला हे समजून घ्यावं लागेल की, तुम्हाला कधी आणि काय खायचं आहे. चला जाणून घेऊ ब्रेकफास्टपासून ते डिनरपर्यंत खाण्यादरम्यानच्या काही टिप्स, ज्यांच्या मदतीने तुम्ही वजन कमीही करू शकाल आणि नियंत्रणातही ठेवू शकाल.
ब्रेकफास्ट
ब्रेकफास्ट हा दिवसातील पहिला आहार असतो. त्यामुळे नाश्त्याला उशीर करू नये. कारण सकाळचा नाश्ता हा आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण असतो. तुमचा नाश्ता हा संतुलित असावा. इडली, अंडी, मोड आलेले कडधान्य, चपाती इत्यादींचं नाश्त्यात सेवन करू शकता. पण नाश्त्यात भाज्यांचं सूप, फळांचा रस फार फायदेशीर ठरतो. याने तुम्हाला लवकर भूक लागणार नाही आणि पोट भरलेलं राहतं. फळं आणि सलादचा नाश्त्यात आवर्जून समावेश करा. तसेच नाश्त्यानंतर तुम्ही ग्रीन टी चं सेवन करू शकता. याने वजन कमी होण्यास मदत मिळेल. नाश्त्यामध्ये तुम्ही दही, छास, दलिया, तूपाची पोळी हेही खाऊ शकता.
लंच
लंच दरम्यान तुमच्यापैकी जास्तीत जास्त लोक हे ऑफिसमध्ये असू शकतात. लंच दरम्यान तुम्ही चपाती, भाजी किंवा भात सेवन करू शकता. जर तुम्ही डायटिंग करत असाल तर दलिया सुद्धा एक चांगला पर्याय आहे. दुपारच्या जेवणात तुम्ही दही, कांदा आणि छास घेऊ शकता. साखर आरोग्यासाठी अजिबात चांगली नाहीये. त्यामुळे गोड पदार्थ कमी खावेत. लंच प्रमाणापेक्षा जास्त करू नका, जेवढं लागतं तेवढंच खावं. सोबतच जेवण झाल्यावर एका तासाने एक ग्लास कोमट पाणी प्यावे. याने शरीरात चरबी तयार होणार नाही.
डिनर
सर्वात महत्त्वाचं म्हणजे डिनर आणि झोपण्याच्या वेळेत तीन ते चार तासांचा गॅप असावा. सांयकाळनंतर आपली हालचाल कमी होते. रात्री उशीरा जेवण केल्याने तुमचं पचनक्रिया बिघडू शकते आणि शरीरात अनावश्यक चरबी जमा होते. त्यामुळे बरं होईल की, तुम्ही झोपण्याच्या तीन किंवा किमान दोन तास आधी जेवण करावं. रात्रीचं जेवण हे दुपारपेक्षा हलकं आणि कमी असावं. याने पचन होण्यास सोपं होईल.
महत्त्वाच्या गोष्टी
काही गोष्टी इथे लक्षात ठेवणे आरोग्यासाठी फार महत्त्वाचे आहे. सकाळी उठून कोमट पाण्याचे सेवन करावे. लिंबू आणि मध मिश्रित करून पाणी प्यायल्यास शरीरातून टॉक्सिक तत्त्व बाहेर काढण्यास मदत मिळते. दिवसाच्या जेवणानंतर एक ग्लास कोमट पाणी प्यायल्याने शरीरातील चरबी कमी होते, ज्यामुळे लठ्ठपणा कमी होण्यास मदत मिळते.