डॉ. अरविंद देशमुख अध्यक्ष, मायक्रोबायोलॉजिस्टस सोसायटी इंडिया
भारतीय संस्कृतीत ताकाचे स्थान फार मोठे आहे. उन्हाळ्यात हवेहवेसे वाटणारे ताक म्हणजे स्वास्थ्य, थंडाव्याचा, उत्तम संगम. घरगुती ताकाचा दर्जा वेगळाच आहे. ताकामुळे आपणास मिळणारे आरोग्य फायदे, ताकासाठी दही निवडताना घ्यायची काळजी, बाजारातील आणि घरगुती ताकाची तुलना, त्वचा व वजनावर धोरणात्मक परिणाम, कोणासाठी ताक उपयुक्त व कोणासाठी नाही आणि ताकाविषयीचे प्रचलित गैरसमज आहेत.
ताकासाठी दही कसं निवडावं?ताक करण्यासाठी गरज असते ती ताज्या, नैसर्गिक, हलक्या आंबट दह्याची ! घरात बांधलेलं, एकसंध, थोडंसं आंबट असलेलं ताजं दही हे सर्वोत्तम मानलं जातं, कारण त्यात लैक्टिक ॲसिड बॅक्टेरिया मोठ्या प्रमाणात असतात. हे सूक्ष्मजीव शक्तिशाली प्रोबायोटिक्स म्हणून पचनसंस्थेला मदत करतात, रोगप्रतिकारशक्ती वाढवतात. आतड्यांचं आरोग्य राखतात. बाजारातील आकर्षक दिसणारं, जाडसर, अत्यंत शुभ्र किंवा कृत्रिम रंग व टिकवणारे पदार्थ असलेलं दही ताकासाठी वापरू नये. ताकासाठी फक्त ताजं, नैसर्गिक दहीच योग्य आहे. खूप जुने किंवा जास्त आंबट दही किंवा दह्यात गंध आला असेल तर ते ताकासाठी टाळावे, कारण त्याने ताकाची चव खराब होते आणि पचनावरही परिणाम होऊ शकतो.
ताक कसं बनवावं?ताक बनवण्याची पद्धत जितकी सोपी तितकी परिणामकारक आहे. एक वाटी ताज्या दह्यात दोन ते तीन वाट्या थंड, उकळून पुन्हा थंड केलेलं पाणी घाला. हे मिश्रण घुसळा जेणेकरून यात गुठळ्या राहू नयेत. ताक शक्यतो साधं असावं. कोणतीही फोडणी, मसाले, जिरे, मीठ, आलं किंवा साखर घालू नये. फक्त दही आणि पाण्याचा हा संयोग नैसर्गिक स्वाद आणि पोषक घटक टिकवतो. अशा ताकात नैसर्गिक सूक्ष्मजीव जास्त प्रमाणात सक्रिय राहतात आणि त्याचे स्वास्थ्यदायी फायदे अधिक मिळतात.
ताक कोणी पिऊ नये?ज्यांना दूध, दही किंवा ताक यातील लैक्टोज पचत नाही (लैक्टोज इन्टॉलरन्स), त्यांनी ताक घेऊ नये किंवा अगदी मर्यादित घ्यावे. अशा लोकांना ताक घेतल्यानंतर पोट दुखणे, फुगणे किंवा जुलाब अशी लक्षणं जाणवू शकतात. याशिवाय, सतत सर्दी, जुलाब, अतिसार अथवा पचनाचा गंभीर त्रास असणाऱ्यांनी किंवा काही गंभीर आजारांनी ग्रस्त असणाऱ्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच ताक प्यावे. लहान बाळांना किंवा नाजूक प्रकृतीच्या वृद्धांनादेखील डॉक्टरांनी सांगितले असेल तर मर्यादित प्रमाणातच ताक द्यावे.
ताकाचे फायदे> ताकात प्रथिने, कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फरस, जीवनसत्त्व बी असे महत्त्वाचे घटक मुबलक प्रमाणात असतात. यामुळे ताक पचनसंस्थेसाठी उपयुक्त आहे. > ताकातील प्रोबायोटिक्समुळे आतड्यातील चांगल्या जिवाणूंची वाढ होते आणि त्यामुळे अपचन, गॅस, आम्लपित्त, बद्धकोष्ठता अशा तक्रारी कमी होतात. > ताक हे सहज पचण्याजोगं असते. ताक त्वचेसाठी लाभदायक आहे. नैसर्गिक डीटॉक्सिफायर म्हणून ताक कार्य करतं. शरीरातील अनावश्यक विषारी घटक बाहेर टाकण्यात मदत करतं. > ताकाच्या नियमित सेवनामुळे त्वचा मऊ, उजळ, निरोगी तजेलदार राहते. ताकातील लैक्टिक ॲसिडमुळे त्वचेच्या मृत पेशी दूर होतात आणि त्वचेला नैसर्गिक ओलावा मिळतो. ताक केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असून, त्यामुळं केसांना पोषण आणि बळकटी मिळते.
बाजारातील आणि घरगुती ताक?काही कंपन्यांचे तयार ताक बाजारात सहज मिळते. पण या ताकामध्ये चव, स्वरूप टिकवण्यासाठी प्रिझर्व्हेटिव्ह्स, कृत्रिम रंग, अधिक मीठ किंवा साखर असे पदार्थ असू शकतात. नैसर्गिक प्रोबायोटिक्सचे प्रमाणही या ताकात कमी असू शकते. म्हणून, पौष्टिकतेच्या दृष्टीने घरी ताज्या दह्यापासून बनवलेलं ताक जेवढं पौष्टिक आहे. स्वतः तयार केलेल्या ताकात नैसर्गिक प्रोबायोटिक्स, पचनासाठी आवश्यक घटक, कॅल्शियम आणि प्रथिने जास्त प्रमाणात मिळतात, शिवाय ते पूर्णपणे शुद्ध व सुरक्षित असतं. बाजारातील तयार ताक वेळेवर सोयीचं असू शकतं; पण दैनंदिन आरोग्यासाठी घरगुती, ताजं साधं ताक अधिक चांगलं ठरतं.
प्रचलित गैरसमजताकाबद्दल अनेक गैरसमज आहेत. काहींना वाटतं ताक फक्त उन्हाळ्यात किंवा पोट बिघडलं असता प्यावं; पण प्रत्यक्षात ताक वर्षभर योग्य प्रमाणात घेतल्यास आरोग्यास लाभदायक असतं. ताकात मीठ, मसाले, साखर घातल्याशिवाय किंवा ताक फोडणीशिवाय स्वादिष्ट, उपयोगी नाही, प्रत्यक्षात नैसर्गिक, केवळ दही आणि पाण्यातून बनवलेलं ताक हेच सर्वोत्तम आहे. ताक आजारी, गरीब, सर्वांच्या आरोग्याचा योग्य साथी आहे.
ताकाच्या दैनंदिन सेवनामुळे पचनक्रिया सुधारते, त्वचा निरोगी राहते, वजन नियंत्रणात येते. शारीरिक स्वास्थ्य जपलं जातं. आपल्या प्रकृतीनुसार व वैद्यकीय सल्ल्यानुसार ताक सेवन करावं. हेच आरोग्याच्या जपणुकीसाठी आवश्यक आहे.