Heart Health Tips : वेगवेगळे हृदयरोग आज जगभरात एक गंभीर समस्या बनत चालले आहेत. हृदयरोगांमुळे जगभरात मृत्यूही सगळ्यात जास्त होतात. अशात हृदयरोग किंवा हार्ट अटॅक टाळण्यासाठी हृदयाची खूप जास्त काळजीही घ्यावी लागते. कारण आजकालच्या चुकीच्या लाइफस्टाईलमुळे कमी वयातच हार्ट अटॅकचा धोका वाढला आहे.
हृदयाच्या आरोग्याबाबत निष्काळजीपणा करणं सगळ्यांनाच महागात पडू शकता. तुमच्या जीवालाही धोका होऊ शकतो. त्यामुळे डॉक्टर सौरभ सेठी यांनी अशा ४ गोष्टींबाबत सांगितलं आहे ज्यांपासून तुम्ही दूर राहिलं पाहिजे. तेव्हाच तुमचं हृदय हेल्दी राहू शकेल आणि हार्ट अटॅकचा धोकाही कमी होईल.
स्ट्रेस
आजकालची लाइफस्टाईल, कामाचा वाढता ताण, वाढत्या जबाबदाऱ्या, स्पर्धा यामुळे अनेकांना स्ट्रेसचा सामना करावा लागतो. स्ट्रेस घेणं हा हृदयरोगाचं एक मुख्य कारण मानला जातो. सतत आणि जास्त स्ट्रेस घेत असाल तर हाय ब्लड प्रेशर आणि इतरही काही समस्या होऊ शकतात. या समस्यांमुळे पुढे जाऊन हृदयही डॅमेज होतं.
कमी झोप
रोज पुरेशी झोप घेणं म्हणजे शरीराच्या मेकॅनिझमला आराम देणं आणि बॉडी रिपेअर करण्याची प्रोसेस असते. पण आजकाल लोक टीव्ही किंवा फोनवर जास्त वेळ घालवत असल्यानं झोप कमी घेतात. ७ ते ८ तासांऐवजी लोक ५ ते ६ तासच झोपतात. अशात हृदयाला आणि शरीराला रिकव्हर होण्यास पुरेसा वेळच मिळत नाही. त्यामुळे रक्तवाहिन्या आणि हृदयावर अधिक दबाव पडतो. याच कारणानं पुढे जाऊन हृदयरोगांचा धोका वाढतो.
शारीरिक हालचाल न करणं
जास्तीत जास्त लोक तासंतास एकाच जागी बसून काम करतात. त्यामुळे त्यांची शारीरिक हालचाल बरीच कमी झाली आहे. यामुळे लठ्ठपणा आणि हाय कोलेस्टेरॉलसारख्या समस्यांचा धोका खूप जास्त वाढतो. अशात रोज थोडा वेळ एक्सरसाईज करावी आणि एकसारखं एका जागी बसण्याऐवजी थोडा वेळ चालावं.
वायू प्रदूषण
आज वायू प्रदूषण एक मोठी समस्या बनलं आहे. तुम्ही जास्त वायू प्रदूषण असलेल्या ठिकाणी राहत असाल तर हे तुमच्या आरोग्यासाठी खूप घातक ठरू शकतं. अशावेळी घरात आणि कारमध्ये एअर प्यूरिफायरचा वापर करा. घरी झाडं लावा. बाहेर जाताना मास्कचा किंवा रूमालाचा वापर करा.