Coronavirus: जानेवारी-फेब्रुवारीत लस येणार; ‘कोव्हिशिल्ड’च्या मानवी चाचणीचा दुसरा टप्पा सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2020 02:08 AM2020-08-27T02:08:07+5:302020-08-27T07:03:41+5:30

पुण्यात भारती हॉस्पिटलमध्ये दिला दोघांना डोस

Coronavirus: The second phase of the Covishield human test begins | Coronavirus: जानेवारी-फेब्रुवारीत लस येणार; ‘कोव्हिशिल्ड’च्या मानवी चाचणीचा दुसरा टप्पा सुरू

Coronavirus: जानेवारी-फेब्रुवारीत लस येणार; ‘कोव्हिशिल्ड’च्या मानवी चाचणीचा दुसरा टप्पा सुरू

Next

पुणे : पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटतर्फे उत्पादित करण्यात येत असलेल्या ‘कोव्हिशिल्ड’ या कोरोनावरील लसीच्या दुसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीस बुधवारी भारती विद्यापीठ हॉस्पिटलमध्ये सुरुवात झाली. दोन स्वयंसेवकांना प्राथमिक वैद्यकीय चाचण्या करून लसीचा अर्धा मिलिलीटर डोस देण्यात आला. दोन्ही स्वयंसेवक पुरुष असून त्यांची वये अनुक्रमे ३२ आणि ४७ वर्ष आहेत.

दोन्ही स्वयंसेवकांना २८ दिवसांनी (सप्टेंबर महिन्यात) दुसरा डोस दिला जाणार आहे. पहिला डोस दिल्यापासून ५७व्या दिवशी (आॅक्टोबर महिन्यात) तपासणीसाठी बोलावले जाईल. ९० दिवसांनी (नोव्हेंबर महिन्यात) त्यांच्यामध्ये कोरोनाविरोधात अँटिबॉडी तयार झाल्या आहेत का, आरोग्याच्या इतर तक्रारी हे पाहिले जाईल. १८० दिवसांनी (फेब्रुवारी महिन्यात) त्यांना हॉस्पिटलमध्ये बोलावले जाऊन लसीची यशस्विता तपासली जाणार असल्याची माहिती वैद्यकीय संचालक डॉ. संजय ललवाणी यांनी दिली. यावेळी डॉ. अस्मिता जगताप, डॉ. सोनाली पालकर, डॉ. जितेंद्र ओसवाल आदी उपस्थित होते.

येत्या सात दिवसात २५ स्वयंसेवकांना लस देण्यात येईल. देशभरात शंभर जणांना ही लस देण्यात येणार आहे. यासाठी १८ वर्षांवरील निरोगी स्त्री-पुरुषांची निवड करण्यात येणार आहे. स्वयंसेवक निवडताना प्रथमत: त्यांची आरटीपीसीआर आणि अ‍ॅँटिबॉडी तपासणी करण्यात येणार आहे.

मानवी चाचणीसाठी सुमारे ३०० जणांनी नोंदणी केली आहे. दोघांना लसीचा डोस देण्यात आला. निवड झालेल्या स्वयंसेवकांपैकी ७५ टक्के जणांना कोव्हिशिल्ड लस तर २५ टक्के लोकांना प्लासेबो इफेक्ट मिळणार आहे. तिसºया टप्प्यात दीड हजार जणांना लस दिली जाईल. त्यानंतर माहितीचा अहवाल शासनाला पाठविला जाईल. प्रत्यक्ष लस बाजारात येण्यासाठी जानेवारी उजाडेल. - डॉ. संजय ललवाणी, वैद्यकीय संचालक, भारती हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर

मानवी चाचणीतील टप्पे
२६ ऑगस्ट : लसीचा पहिला डोस
२४ सप्टेंबर : लसीचा दुसरा डोस
२४ नोव्हेंबर : अँटिबॉडी तयार होण्याची प्रक्रिया, लसीचे दुष्परिणाम याबाबत तपासणी
२४ फेब्रुवारी : १८०व्या दिवशी अंतिम तपासणी

Web Title: Coronavirus: The second phase of the Covishield human test begins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.