(Image Credit : New York Post)
अलिकडे कमी वयातच अभ्यासाच्या वाढत्या तणावमुळे लहान मुला-मुलींमध्ये डिप्रेशन आणि अस्वस्थतेची समस्या वाढत आहे. त्यामुळे यावर सतत काहीना काही रिसर्च सुरू असतात. लहान मुलं-मुली डिप्रेशन आणि अस्वस्थ आहेत किंवा नाही हे त्यांच्या आवाजावरून जाणून घेता येतं. संशोधकांनी आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर करून एक अशी सिस्टीम तयार केली आहे, ज्याने आवाजाचं विश्लेषण करून डिप्रेशन आणि अस्वस्थतेची माहिती घेता येते.
अमेरिकेतील वर्मोंट यूनिव्हर्सिटीने ही सिस्टीम तयार केली आहे. संशोधक एलेन मॅकगिनीस म्हणाले की, कमी वयात लहान मुले लवकर डिप्रेशनचे शिकार होतात, त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर अशात स्थितीची माहिती मिळवण्याची गरज आहे.
हा रिसर्च ३ ते ८ वयोगटातील ७१ मुला-मुलींवर करण्यात आला. शोधादरम्यान मुलांच्या मूडचा अभ्यास करण्यात आला. यात त्यांना एक तीन मिनिटांची स्टोरी देण्यात आली आणि ती वाचायला सांगण्यात आली. यावेळी संशोधक हे परिक्षकाच्या भूमिकेत होते. त्यांनी केवळ न्यूट्रल किंवा निगेटीव्ह प्रतिक्रिया दिल्यात.
आधी ९० आणि नंतर ३० सेकंद शिल्लक असताना संशोधक घंटी वाजवत होते आणि विचारत होते की, स्टोरी किती शिल्लक आहे. मुलांमध्ये तणाव तयार व्हावा यासाठी अशी स्थिती तयार करण्यात आली होती. त्यानंतर मुलांचा क्लीनिकल इंटरव्ह्यू करण्यात आला. आणि अनेक प्रश्न विचारण्यात आले. यादरम्यान एआय सिस्टीम यशस्वी ठरली.
संशोधकांनी लहान मुलांच्या कथांची ऑडीओ रेकॉर्डिंगचं एआय सिस्टीमने विश्लेषण केलं. यातून समोर आलं की, हा अल्गोरिदम लहान मुला-मुलींच्या अशा डिसऑर्डरची ८० टक्के अचूक माहिती देण्यास सक्षम आहे. त्यानंतर त्यांच्या पालकांशी बोलून परिणामांची शहानिशा करण्यात आली.
बायोमेडिकल अॅन्ड हेल्थ इन्फॉर्मेटिक्स जर्नलमध्ये प्रकाशित शोधानुसार, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स असलेल्या सिस्टीममध्ये अल्गोरिदम फार वेगवान आणि सोप्या पद्धतीने अशा स्थितींची माहिती मिळवू शकतं. संशोधक एलेन मॅकगिनीस म्हणाले की, आठ वर्षांपेक्षा कमी वयाच्या लहान मुलांमध्ये डिप्रेशन आणि अस्वस्थेची ओळख पटवणे कठीण असतं. अशा केसेसमध्ये सुरूवातीलचा उपचार करणे गरजेचे असते. कारण या वयात त्यांच्यां मेंदूचा विकास होत असतो. याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर भविष्यात त्यांच्या आत्महत्या आणि विष सेवन करण्याचा घटनांचा धोका अधिक वाढतो.