गोंदिया : एप्रिल व मे महिन्याचे पगार काढण्यात यावे या मागणीला घेऊन येथील महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने मंगळवारी (दि.२४) जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षांना घेराव घातला. दरम्यान अध्यक्षांनी कोषागार अधिकारी तसेच जिल्हा परिषदेचे लेखा व वित्त अधिकारी यांच्याशी फोनवरून चर्चा केली. यावर शिक्षकांनी येत्या २८ जून पर्यंत पगार न निघाल्यास आंदोलन अधिक तिव्र करण्याचा इशारा दिला. शासनाने शिक्षकांच्या पगारासाठी शालार्थ वेतन प्रणाली सुरू के ली आहे. त्यांतर्गत शाळा मुख्याधिकाऱ्यांना शाळेतील संपूर्ण शिक्षकांची माहिती संगणकात फिड करून गटशिक्षणाधिकाऱ्यांना द्यावयाची होती. गटशिक्षणाधिकाऱ्यांना ती माहिती शिक्षणाधिकाऱ्यांना तर शिक्षणाधिकाऱ्यांना मुख्य लेखा वित्त अधिकाऱ्यांना द्यावयाची होती. त्यानुसार जिल्ह्यातील शाळा मुख्याधिकाऱ्यांनी इंटरनेट कॅफेवर प्रती शिक्षक ५० रूपये दराने संपूर्ण माहिती फिड करून गटशिक्षणाधिकाऱ्यांना, गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आली. मात्र शिक्षणाधिकारी व मुख्य लेखा वित्त अधिकारी यांच्या दुर्लक्षीतपणामुळे शिक्षकांचे एप्रिल व मे महिन्याचे पगार अद्याप निघालेले नाहीत. विशेष म्हणजे फक्त गोंदिया जिल्ह्यातच हा प्रकार घडला असून सुमारे चार हजार ५०० शिक्षकांचे पगार अडले आहेत. या विषयांवर ३० मे व १६ जून रोजी जिल्हा परिषद पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सभा घेऊनही फक्त आश्वासनच मिळाले. त्यामुळे जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांत चांगलाच रोष निर्माण झाला होता. तर एप्रिल व मे महिन्याचे पगार देण्यात यावे व प्रत्येक शाळेला संगणक, इंटरनेट, प्रिंटर सुविधा पुरविण्यात यावी. तसेच साहीत्यांची पूर्तता होत नाही तोपर्यंत शालार्थ वेतन आॅनलाईन पंचायत समिती स्तरावरून करण्यात यावे व प्रती शिक्षकाला लागणारा ५० रूपये खर्च थांबविण्यात यावा या मागण्यांसाठी मंगळवारी (दि.२४) घेराव घालणार असल्याचा इशारा प्राथमिक शिक्षक संघाने दिला होता. त्यानुसार मंगळवारी (दि.२४) महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने सकाळी ११ वाजताच जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर ठिया आंदोलन करण्यात आले. तर जिल्हा परिषदेत दाखल होताच अध्यक्ष विजय शिवणकर व उपाध्यक्ष मदन पटले यांना घेराव घालण्यात आला. दरम्यान जिल्हा परिषद अध्यक्ष शिवणकर यांच्या दालनात चर्चे दरम्यान त्यांनी फोनवरून कोषागार अधिकारी व जिल्हा परिषद लेखा व वित्त अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच लेखाधिकारी मुंबईत असल्याने त्यांच्या सही साठी बुधवारी (दि.२५) एक कर्मचारी मुंबईला पाठविणार असल्याचे शिक्षकांच्या प्रतिनिधी मंडळाला सांगीतले. यावर प्रतिनिधी मंडळाने २८ जून पर्यंतची मुदत दिली असून तोपर्यंत पगार न निघाल्यास आंदोलन तिव्र करणार असल्याचा इशारा दिला. या आंदोलनात मोठ्या संख्येत शिक्षक व शिक्षीकांनी भाग घेतला होता. (शहर प्रतिनिधी)
जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षांचा घेराव
By admin | Updated: June 25, 2014 00:31 IST