आमगाव : गोपीनाथ मुंडे यांनी युवावस्थेत सामाजिक बांधिलकी जोपासत जनतेच्या लढ्यासाठी अविरत परिश्रम घेतले. मागासवर्गीयांच्या प्रश्नांना त्यांनी राष्ट्रीय पातळीवर उचलून धरले. बहुजनांच्या हितासाठी त्यांचा संघर्ष जीवनाच्या अंतिम श्वासापर्यंत सुरूच होता. त्यांच्या जीवनकार्यातून युवकांनी प्रेरणा घ्यावी, असे प्रतिपादन माजी आमदार भेरसिंह नागपुरे यांनी केले.भारतीय जनता पक्ष आमगाव तालुका मंडळाच्यावतीने बुधवारी (दि.३) बनगावच्या ग्राम पंचायत भवनात आयोजित लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. याप्रसंगी अॅड येशुलाल उपराडे, पंचायत समिती सभापती हनवत वट्टी, सरपंच सुषमा भुजाडे, पंचायत समिती सदस्य हरिहर मानकर, यशवंत मानकर, उपसरपंच मनोज सोमवंशी, नरेंद्र बाजपेई, ज्योती खोटेले, मोहिनी निंबार्ते, सरोज कोसरकर, जयप्रकाश शिवनकर, ललीत मानकर, निखील कोसरकर, अग्रवाल, काशीराम हुकरे, बाळा ठाकूर, बाळू भुजाड प्रामख्याने उपस्थित होते. पुढे बोलताना त्यांनी, गोपीनाथ मुंडेचे जीवन संघर्षातून पुढे आले असून त्यांनी निश्चित ध्येय स्विकारुन जनतेच्या सेवेचे व्रत स्विकारले. त्यांनी सदैव आर्थिक दुर्बल घटकांसाठी संघर्ष तेवत ठेवला. त्यांना बहुजनांच्या सेवेने आदराचे स्थान मान मिळाले असे मत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी राजेश मानकर, कमलेश चुटे, निमेश दमाहे यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)
मुंडेच्या जीवनकार्यातून युवकांनी प्रेरणा घ्यावी
By admin | Updated: June 5, 2015 01:57 IST