नरेश रहिले
गोंदिया : स्मशान हे नाव घेताच अनेकांच्या मनात नकारात्मक विचार निर्माण होतात, थोडी भीतीही वाटते. अंत्यसंस्कार केल्यानंतर घरी परतून आंघोळ करणारी सर्वच मंडळी जणू स्मशानघाटाला अपवित्र समजते. परंतु या स्मशानघाटाला (मोक्षधाम) म्हणून संबोधले जाते. हा मोक्षाकडे जाण्याचा मार्ग अपवित्र कसा राहू शकतो. मोक्षाची प्राप्ती मिळविण्यासाठी ज्या घाटावर अंत्यसंस्कार केले जाते ते घाट तीर्थस्थळ व्हावे यासाठी आमगाव येथील विविध घटकांतील लोकांनी एकत्र येऊन शिव मोक्षधाम सेवा समिती रिसामा/आमगाव म्हणून तयार केली. या स्मशानघाटाला करुण कहाणी सांगण्यापेक्षा कीर्तीचे व यशाचे धडे सांगावे यासाठी स्मशानघाटावरच जणू तीर्थस्थळ उभारण्यात आला. स्मशानघाटावर सहा महिने ते वर्ष काढून सामाजिक कार्यकर्त्या सिंधूताई सपकाळ यांनी आपला जीवनाचा प्रवास चालविला, त्यांचा आदर्श डोळ्यापुढे असताना आमगावातील लोकांनी एकत्र येऊन किडंगीपार नाल्यावर असलेल्या स्मशानघाटाचा कायापालट केला. मुंबई-हावडा रेल्वे मार्गावर रेल्वे पुलाच्याखाली असलेले हे स्मशानघाट चार वर्षांपूर्वी दुरवस्थेत होते. याकडे शासन व लोकांचेही लक्ष नव्हते. परंतु मार्च २०१७ मध्ये एकत्र आलेल्या आमगाव व रिसामा येथील नागरिकांनी शिव मोक्षधाम सेवा समिती स्थापन केली. शासनाकडून मदत मिळाली नाही तरी स्वखर्चातून या स्मशानघाटाचा कायापालट करण्याचा संकल्प केला. मागील चार वर्षांपासून या स्मशानघाटावर दर रविवारी २० ते २५ लोक सकाळी ७ वाजता गोळा होतात. दर रविवारी सकाळी ७ ते ९ वाजता दोन तास श्रमदान करून मोक्षधामाचा चेहरा-मोहरा बदलण्याचा प्रयत्न करतात. या समितीतील प्रत्येक सदस्य महिन्याकाठी शंभर रुपये गोळा करून येथे आवश्यक असणाऱ्या बाबींची ते पूर्तता करतात. स्वच्छता, बसण्याची व्यवस्था, मुलांना खेळण्यासाठी मैदान तयार करण्यात आले आहे. शिवमंदिर उभारण्यात आले. या स्मशानघाटाचर परिसर रमणीय व्हावा, २ एकर ७३ डिसमील परिसरात असलेल्या या स्मशानघाटावर सर्व सोयी सुविधा उपलब्ध करण्यासाठी येथील सदस्यांनी चार वर्षात १० लाख रुपये खर्च करून त्याचा कायापालट केला. इतकेच नव्हे तर आमगावातील नामवंत व्यक्तीही या समितीसोबत जुळले आहेत. प्रत्येक सदस्याचा वाढिदवस असेल त्या आठवड्याच्या रविवारी केक कापून त्याचा वाढदिवस साजरा केला जातो. आमगाव येथील प्रतिष्ठित नागरिक प्रमोद कटकवार यांचा वाढदिवस या नुकताच याच ठिकाणी केक कापून सर्व सदस्यांनी साजरा केला. समितीचे अध्यक्ष रवी क्षीरसागर, उपाध्यक्ष संजय बहेकार, सचिव महेश उके, विजय मेश्राम, संपर्क प्रमुख राजेश मेश्राम, राजेश सातनुरकर, नारायण मेश्राम, राजू आंबेडारे, संजय ढगे, प्रमोद कटकवार, संतोष कटकवार, मुन्ना शेंडे, मनोज शाहू, आशिष दुबे, भरतलाल राणे, राजेश देशमुख, सुरेश बावनथडे, नीलकंठ बारसागडे, प्रवीण येवले, भोला गुप्ता, अशोक मुनेश्वर, मोरेश्वर गायधने, सचिन मेश्राम, रमेश चव्हाण, राजू वंजारी व शेंडे हे मोक्षधाम परिसराची स्वच्छता राखण्यासाठी श्रमदान करतात.
बॉक्स
योगाभ्यासापासून कोजागिरीपर्यंतचे कार्यक्रम
या मोक्षधाम परिसराला रमणीय स्थळ म्हणून नावारूपास आणण्यासाठी येथील सदस्य जीव तोडून काम करतात. योगदिन, कोजागिरी साजरी करण्यात आली. महाशवरात्रीला मुख्यद्वार लावले जाणार आहे. या ठिकाणी लोकांची वर्दळ वाढावी यासाठी फोर लेअर मॉर्निंग वॉक तयार केले जाणार आहे. महाशिवरात्रीची जत्रासुद्धा या ठिकाणी भरविली जाणार आहे. पोलीस भरतीसाठी उत्कृष्ट मैदान तयार करण्याची प्रक्रिया या समितीकडून केली जात आहे.
(टीप : हा लेख मंथनसाठी आहे)