लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : एटीएममधून पैसे काढण्यासाठी मदत केल्याचा दिखावा करीत एटीएम कार्ड बदलून परस्पर पैसे काढण्याच्या घटना जिल्ह्यात घडत आहेत. त्यामुळे एटीएममधून पैसे काढताना सावधानता बाळगणे आवश्यक आहे. वृद्धांना किंवा महिलांना एटीएमवर पैसे काढण्यासाठी मदत करतो, असे भासवून एटीएम कार्ड बदलून किंवा पिन क्रमांक पाहून फसविण्याचे प्रकार जिल्ह्यात यापूर्वी घडले आहेत. काही दिवसांपूर्वीच अशा दोन घटना घडल्या आहेत.
त्यामुळे एटीएमचा क्रमांक, पिन क्रमांक कोणालाही सांगू नका, तसेच बैंकेसंदर्भातील ओटीपी कोणालाही देऊ नये, असे आवाहन केले आहे. जेथे ग्राहकांची वर्दळ नसते, अशा ठिकाणी एटीएम केंद्राबाहेर काही भामटे असतात. वृद्ध किंवा महिला आल्यानंतर त्यांना फसविण्यासाठी ते बहाणा शोधतात. एटीएमची सिस्टम बंद आहे, तुम्हाला मदत करतो, असे सांगून एटीएम कार्ड घेऊन पिन क्रमांक माहीत करून घेतात, ते ग्राहकाला एटीएम कार्ड बदलून देत पैसे काढतात.
.....अशी होऊ शकते फसवणूक
- एटीएममध्ये पैसे अडकत आहेत : एटीएममध्ये पैसे अडकतात, अशी भीती घालून मदतीचा बहाणा करून भामटे फसवणूक करतात.
- सिस्टम बंद पडते : एटीएम मशीनवरील सिस्टम बंद पडते. थांबा, मी मदत करतो, असे सांगून एटीएम कार्ड मागून घेत फसवणूक केली जाते.
- मशीनच बंद पडते : एटीएम मशीन वेगळी आहे. मध्येच बंद पडू शकते, अशी भीती घालून भामटे फसवणूक करतात, तसेच काही वेळा कार्ड घातल्यानंतर केवळ प्रक्रिया होते तसेच चुकीच्या व्यवहाराने पैसे मिळत नाहीत. त्यावेळी फसवणूक होते. फसवणूक होताच तत्काळ नजीकच्या पोलिस ठाण्यात वा सायबर सेलशी संपर्क करा.
वर्षभरात अनेकांची फसवणूक
- एटीएम केंद्रावर मदतीचा बहाणा करून फसवणुकीचे प्रकार थांबून थांबून घडत असतात. वर्षभरात काही ठिकाणी असे फसवणुकीचे प्रकार घडले आहेत.
- एटीएम कार्डचा पिन क्रमांक टाकून पैसे काढतात. याचाच फायदा घेत काही भामटे हातचलाखी करून बँक खाते रिकामे करीत असल्याच्या घटनादेखील घडलेल्या आहेत. यामुळे नागरिकांनी सावध राहण्याची गरज आहे.
एटीएम केंद्रावर काय काळजी घ्याल?बटणांच्या शेजारी कोणते वेगळे मशीन बसवले नाही ना, हे तपासावे. एटीएम मशीन हाताळता येत नसेल तर जेथे सुरक्षारक्षक असतात, तेथे जाऊन त्यांची मदत घ्यावी. अनोळखी व्यक्तीकडे शक्यतो मदत मागू नका, व्यवहार पूर्ण झाल्यानंतर कॅन्सलचे बटण दाबा
वृद्ध व्यक्तींना करतात टार्गेट"एटीएम अदलाबदल प्रकरणात वृद्ध व्यक्तींना टार्गेट केल्याचे दाखल तक्रारीवरून दिसून येत आहे. जिल्ह्यात एटीएम बदली करून फसवणूक करण्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. यासाठी अनोळखींना एटीएम कार्ड देऊ नका, पिन कोड क्रमांकही जपून ठेवावा."-ओमप्रकाश गेडाम, सायबर सेल प्रमुख, गोंदिया