लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : सडक अर्जुनी तालुक्यातील खजरीजवळ झालेल्या शिवशाही बसच्या अपघात प्रकरणात आता एसटी महामंडळाचे अधिकारही अडचणीत येण्याची शक्यता आहे. ज्या शिवशाही बस चालकामुळे हा अपघात घडला व यापूर्वीसुद्धा त्याच्याकडून सहा अपघात घडले असतानासुद्धा चालकावर कारवाई न करता सेवेत का कायम ठेवले? यावरून आता परिवहन विभागाकडून घेरले जात आहे. त्यामुळे याप्रकरणी संबंधित जबाबदार अधिकाऱ्यावरसुद्धा निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे.
खजरीजवळ झालेल्या शिवशाहीच्या भीषण अपघातात ११ जणांना प्राणास मुकावे लागले, तर २९ प्रवासी गंभीर जखमी झाले. या अपघातामुळे शिवशाही बसच्या आरामदायी आणि सुरक्षित प्रवासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे, तर अनेक शिवशाही बस अनफिट असून, रस्त्यावर धावत असल्याची बाब या अपघातानंतर पुढे आली. गेल्या दोन वर्षांपासून शिवशाही बसच्या देखभाल दुरुस्तीकडेसुद्धा एसटी महामंडळाचे दुर्लक्ष झाले आहे. खजरी येथील अपघातानंतर ही बाब आता शासन आणि महामंडळानेसुखफधा गांभीर्याने घेतली आहे, तर ज्या शिवशाही बस चालकाच्या हातून हा अपघात घडला त्याच्याकडूनच पूर्वी सहा अपघात घडले असून, तीन अपघाताची त्याच्यावर जबाबदारीसुद्धा निश्चित करण्यात आली होती. मग याप्रकरणी एसटी महामंडळाच्या संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांनी त्याच्यावर कारवाई न करता त्याला सेवेत का कायम ठेवले, असा प्रश्नसुद्धा परिवहन विभागाने उपस्थित केला आहे. सोमवारी (दि.२) गोंदिया उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील दोन सहायक मोटारवाहन निरीक्षकांना यासंदर्भातील चौकशीकरिता भंडारा येथे पाठविण्यात आले होते. सहायक मोटार वाहन निरीक्षक अमित रौंदळ यांनी अपघातग्रस्त शिवशाही बसचे फिटनेस व चालकावर कारवाई करण्यास दिरंगाई याबाबत चौकशी केली. त्यामुळे आता या अपघात प्रकरणात एसटी महामंडळाच्या जबाबदार अधिकाऱ्यांवरसुद्धा कारवाई होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सात दिवसांत देणार परिवहन आयुक्तांना अंतिम चौकशी अहवाल शिवशाही बस अपघात प्रकरणाची चौकशी सध्या अंतिम टप्प्यात आहे. प्राथमिक चौकशीत या अपघातास अति वेग आणि चालकाची चूक हेच कारणीभूत असल्याचा ठपका चौकशीसाठी आलेले नागपूरचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण व अधिकाऱ्यांनी ठेवला होता. त्यानंतर या अपघातातील सर्व बारीकसारीक बारकावे तपासले जात आहेत. शिवशाही बसचे फिटनेस, चालकावर कारवाईस दिरंगाई या सर्व बाबींचा एकत्रित चौकशी अहवाल तयार करून तो परिवहन आयुक्तांना सादर केला जाणार आहे. यानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्याऱ्यांनी दिली.