गोंदिया : वाढत्या तापमानाने जमिनीतील पाण्याचे स्रोत आटल्याने माणसासोबतच वन्यप्राण्यांनाही याचा फटका बसत आहे. जंगलातील पाणवठ्यांचे पाणी संपल्याने विविध प्राणी गावालगत व वाहतुकीच्या रस्त्यावर आढळून येत आहेत. या प्राण्यांचा पाण्याअभावी मृत्यू होऊ शकतो. त्यातच शिकार्यांना शिकारीची संधी नाकारता येत नाही. त्यामुळे या काळात वन्यजीव संरक्षणाला धोका निर्माण झाला आहे. जिल्ह्यात अनेक जंगले आहेत. त्यात अनेक वन्यप्राण्यांचे स्थान आहे. प्रामुख्याने नागझिरा, नवेगावबांध, उमरझरी व मुरदोली जंगल परिसर भागात याचे प्रमाण जास्त आढळते. त्यात हिंस्त्र प्राणीही आहेत. जंगल भागातील नैसर्गिक पाण्याचे साठे आटल्याने व पाणवठे कोरडे राहात असल्याने वन्यप्राणी गावालगत पाण्याच्या शोधात येत आहेत. सायंकाळच्या सुमारास प्राणी थंड ठिकाणी व रस्त्यावर येत असल्याने त्यांचे प्रत्यक्ष दर्शन घडत आहे. जंगलात पाणी मिळत नसल्याने तहानेने व्याकूळ प्राण्यांचे कडप दिवसाढवळ्या गावालगतच्या तळ्यांवर व नहरावर तहान भागविण्यासाठी येत असतात. त्यातच जंगलातील रहदारी असलेल्या ठिकाणीही हे प्राणी येत आहेत. तहानेने व्याकूळ झालेल्या या प्राण्यांना पाणी मिळत नसल्यामुळे त्यांचा मृत्यू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच या निराधार प्राण्यांची शिकारसुद्धा केली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे या काळात वन्यजीवांना धोका संभवतो. हरिण, सांबर, चितळ, बारासिंगे, रानगवे, नीलघोडे व अन्य वन्यप्राण्यांचा यात समावेश असल्याचे आढळते. त्यामुळे शिकार करणार्यांना चांगली संधी प्राप्त झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचप्रमाणे वाघ, अस्वल यासारखे हिंस्त्र प्राणी पाण्यालगतच्या परिसरात दबा धरून राहतात. त्यामुळे तहानेने व भुकेने व्याकूळ प्राणी प्राणघातक हल्ला चढविण्यासही मागे-पुढे पाहत नाही.जंगलातील पाणवठ्यामध्ये उन्हाळ्यात पाणी भरण्याची मागणी वन्यप्रेमींनी केली आहे.
=पाणी न मिळाल्याने वन्यप्राण्यांच्या जीवास धोका
By admin | Updated: May 19, 2014 23:40 IST