केशोरी : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील केशोरी हा भाग नक्षलग्रस्त व दुर्लक्षित भाग असून राज्यभरात मिरचीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. या भागाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी राजकीय नेतृत्वाची गरज आहे. राजकीय नेतृत्वाअभावी हा परिसर विकासापासून कोसोदूर जात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या भागात पाणी सिंचन व्यवस्था पुरेशी नाही. औद्योगिक विकास नाही. यामुळे तरुण सुशिक्षित बेकारांच्या हाताला काम नाही. आता साकोली जिल्ह्याची मागणी जोर धरु लागली आहे. त्याबरोबरच केशोरी तालुक्याची निर्मिती करण्यात यावी अशी मागणी पुढे येत आहे. १६ वर्षापुर्वी गोंदिया जिल्ह्याची निर्मिती झाली तेव्हा केशोरीला स्वतंत्र तालुक्याचा दर्जा देऊन ४४ गावांचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी केली होती. त्यावेळेस शासनाने केशोरी तालुका निर्मितीची दखल घेतली नाही. सध्या शासनदरबारी साकोली जिल्हा निर्मिती संबंधी चर्चेला उत आले आहे. त्याचबरोबर येथील राजकीय पुढाऱ्यांनी साकोली जिल्हा निर्मितीची मागणी केली आहे. जर साकोली जिल्हा निर्मितीची घोषणा झाल्यास केशोरीला नवीन तालुका निर्माण करुन साकोली जिल्ह्यात समाविष्ट करण्यात यावे अशी या परिसरातील नागरिकांची अपेक्षा आहे. निवडणूक प्रसंगी बड्या पुढाऱ्यांनी केशोरी तालुका निर्मितीचे आश्वासन दिले होते. परंतु दिलेले आश्वासन हवेतच विरले. तालुका निर्मितीचे गाजर देऊन मतांचा जोगवा मागण्या व्यतिरिक्त पुढारी काहीच करीत नसल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. अर्जुनी-मोरगाव तालुक्याच्या सीमेचा विचार करुन नवीन विधानसभा क्षेत्र निर्माण करण्यात आले. अर्जुनी-मोरगाव तालुका विस्ताराने जिल्ह्यात सर्वात मोठा आहे. या तालुक्याच्या शेवटच्या टोकाचे अंतर ५० किमी. पर्यंत आहे. केशोरी परिसरातून तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. (वार्ताहर)
केशोरी तालुक्याला निर्मितीची प्रतीक्षा
By admin | Updated: September 12, 2015 01:41 IST