रोपं करपताहेत : सरासरीच्या तुलनेत पावसाचे प्रमाण अत्यल्पगोंदिया : मृगात बरसलेल्या पावसाने गेल्या १५ दिवसांपासून दांडी मारल्याने विदर्भातील ११ जिल्ह्यात खरीपातील पिकं संकटात सापडली आहेत. नागपूर विभागात अवघ्या ८ टक्के तर अमरावती विभागात जेमतेम ९ टक्के पेरण्या आटोपल्या आहेत. आणखी दोन-तीन दिवसात पाऊस आला नाही तर अंकुरलेली रोपे पूर्णपणे करपली जाऊन ती वाचविणे कठीण होणार आहे.पश्चिम विदर्भात कापूस व सोयाबीन हे खरीपातील मुख्य पिक आहे तर पूर्व विदर्भात धानाचे क्षेत्र सर्वाधिक आहे. कापूस पट्ट्यात कमी पाण्यातही लागवड होत असल्यामुळे लागवडीचे प्रमाण जास्त आहे. मात्र पूर्व विदर्भात पावसाशिवाय धानाच्या आवत्या टाकणे किंवा पऱ्हे लावणी शक्य नाही. त्यामुळे गोंदिया, भंडारा, गडचिरोली जिल्ह्यात अवघी एक टक्के लावणी झाली आहे.नागपूर विभागातील नागपूर, चंद्रपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा, गडचिरोली या सहा जिल्ह्यांमध्ये खरीप हंगामात एकूण १८ लाख ३६ लाख ६०० हेक्टर लागवड क्षेत्र आहे. त्यापैकी ३० जूनपर्यंत १ लाख ३९ हजार ८०० हेक्टरवर पिकांची लागवड झाली आहे. तर पश्चिम विदर्भात अर्थात अमरावती विभागातील अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलडाणा आणि वाशिम या पाच जिल्ह्यांमध्ये खरीप हंगामाचे लागवड क्षेत्र ३२ लाख ८२ हजार ३०० हेक्टर आहे. आतापर्यंत त्यापैकी २ लाख ८२ हजार ३०० हेक्टरवर लागवड झाली आहे. गेल्यावर्षी अमरावती विभागात ३० जूनपर्यंत ६४ टक्के पेरणी झाली होती. मात्र यावर्षी हे प्रमाण अवघे ९ टक्के आहे.जून महिन्यात अमरावती विभागात सरासरी १५२.५ मिमी पाऊस होतो. परंतू यावर्षी जून अखेर पडलेल्या पावसाची सरासरी केवळ ४१.०० मिमी आहे. पाऊस लांबल्यामुळे कमी कालावधीत निघणाऱ्या मूग, उडीद या पिकांवर संक्रांत येणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
विदर्भात अवघ्या ८.५ टक्के पेरण्या
By admin | Updated: July 5, 2014 23:39 IST