लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोनाविरुद्धच्या लढ्यात लसीकरण हे महत्त्वपूर्ण शस्त्र आहे. त्यामुळे शासन आणि प्रशासनाचा भरसुद्धा लसीकरण मोहिमेवर आहे. अधिकाधिक प्रमाणात लसीकरण व्हावे यासाठी व्यापक जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. मात्र, दुसरीकडे शासनाकडून जिल्ह्याला नियमित लसींचा पुरवठा होत नसल्याने वांरवार लसीकरण मोहिमेला ब्रेक लागत आहे. लसीकरण मोहीम व्यापक स्तरावर राबविण्यासाठी जिल्ह्याला दररोज ५०० डोसची गरज आहे; पण पुरवठा केवळ २०० डोसचा होत आहे. अनेकदा तर तो सुद्धा पुरवठा होत नसल्याने मोहीम बंद ठेवण्याची वेळ आरोग्य विभागावर येते. सध्या गोंदिया जिल्ह्याला कोविशिल्डचे ११ हजार डोस आणि कोव्हॅक्सीनचे ३४०० डोस प्राप्त झाले. त्यामुळे लसीकरण मोहिमेला थोडी गती आली. दररोज ६४८९ हजार नागरिकांचे लसीकरण केले जात आहे; पण लसीकरणाला मिळत असलेला प्रतिसाद पाहता हे डोसदेखील लवकरच संपण्याची शक्यता आहे. लसीकरण मोहीम अविरतपणे सुरू ठेवण्यासाठी शासनाने लसींचा नियमित पुरवठा करण्याची गरज आहे. जिल्ह्यातील बऱ्याच भागांत लसीकरण बंद आहे. त्यामुळे अनेक नागरिकांना लसीकरणासाठी केंद्रावर गेल्यानंतर मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष आहे. जिल्हा आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासन व्यापक स्तरावर लसीकरण मोहिमेसाठी जिवापाड परिश्रम घेत आहेत.
१३० केंद्रांवरून लसीकरण सुरू जिल्हा प्रशासन व आरोग्य विभाग लसीकरण मोहिमेचा वेग वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. जिल्ह्यातील १४५ केंद्रांवर लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे, तर १८ ते ४० वर्षे वयाेगटातील नागरिकांसाठी वेगळी पाच केंद्रे सुरू केली आहेत. यासाठी ५ हजार लसींचे डोस उपलब्ध करून दिले आहेत; पण ४५ वर्षांवरील नागरिकांना लसीकरणासाठी लसींचा पुरवठा कमी प्रमाणात झाल्याने सध्या केवळ १३० केंद्रांवरून लसीकरण सुरू आहे.
१८ वर्षांपेक्षा जास्त वयाचेही आणि दुसरा डोस घेणारे ही येथेच - १८ वर्षांपेक्षा जास्त वयाचेही आणि दुसरा डोस घेणारे ही येथेच येत असल्याने आरोग्य विभागाने लसीकरणादरम्यान गोंधळ उडू नये यासाठी १८ वर्षांवरील नागरिकांना लसीकरणासाठी खमारी प्राथमिक आरोग्य केंद्र, कुडवा उपकेंद्र, तिरोडा उपजिल्हा रुग्णालय, सडक अर्जुनी व अर्जुनी ग्रामीण रुग्णालय आदी ठिकाणी व्यवस्था केली आहे, तर दुसरा डोस घेणाऱ्यांसाठी केटीएस आणि बीजीडब्ल्यू रुग्णालयासह १४५ केंद्रांवर व्यवस्था केली आहे. लसीकरणासाठी सकाळी ८ वाजेपासूनच रांगा- कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी युवकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. शहरातील कुडवा येथील केंद्रावर १८ वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या केंद्रावर सकाळी ८ वाजेपासून युवकांच्या रांगा लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. एका दिवशी एका केंद्रावरून १०० नागरिकांना लस देण्याचे नियोजन आरोग्य विभागाने केले आहे.