अविनाश कोटांगले : पिंडकेपार येथे सेंद्रीय शेती प्रशिक्षण देवरी : आजच्या आधुनिक काळात शेतकरी आपल्या शेतात खूप पैसे खर्च करुन रासायनिक खताचा वापर करतात. अशा खतांचा वापर करुन घेतलेल्या पीक उत्पादनात वाढ न होता उलट अशा उत्पादनाने आपल्या जीवनातील आहारात वापर केल्याने आपल्या आरोग्यास त्रास होऊ शकतो. अशा त्रासापासून आपल्या आरोग्यास वाचविण्याकरिता आणि कमी खर्चात जास्त प्रमाणात पिकांचे उत्पन्न घेण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतात सेंद्रीय खताचा वापर करावे, असे प्रतिपादन देवरी तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले यांनी केले. ते तालुक्यातील पिंडकेपार येथील कृषी भवनात देवरी तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाच्या वतीने तंत्रज्ञान यंत्रणा व्यवस्थापन (आत्मा) अंतर्गत घेण्यात आलेल्या सेंद्रीय शेती प्रशिक्षण कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत होते. याप्रसंगी पं.स. सदस्य लखन सलामे, पिंडकेपारचे उपसरपंच घुघवा, प्रगतीशील शेतकरी हंसराज कोलिया, चिचगडचे मंडळ कृषी अधिकारी मनोहर तलमले, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सपना लांडगे, सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक सिद्धार्थ राऊत, कृषी सहायक जी.पी. कोरे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. या वेळी सेंद्रीय शेती अंतर्गत पिंडकेपार गावची निवड करून येथील ५० शेतकऱ्यांचे गट तयार करुन त्यांना सेंद्रीय पद्धतीने शेती करण्यास प्रोत्साहित करण्यात आले. प्रास्ताविकात सपना लांडगे यांनी सेंद्रीय शेतीचे उद्देश व फायदे सांगितले. तर मंडळ कृषी अधिकारी मनोहर तलमले यांनी भात शेतीत बियाणे, खते व औषधी यावरील खर्च कमी करण्याकरिता हिरवळीच्या खताचा वापर व फायदे आणि जैविक कीटकनाशके, खते याचा अवलंब करुन सेंद्रीय शेती करण्याबाबद मार्गदर्शन केले. तसेच सिद्धार्थ राऊत यांनी चित्रफितीद्वारे बिजामृत, जिवांमृत, अमृतपाणी, दशपणी अर्क व गांडुळखत तयार करण्याच्या पद्धती शेतकऱ्यांना समजावून सांगितले. प्रशिक्षणात शेतकऱ्यांना जैविक कीटकनाशके तैयार करण्याकरिता प्लास्टिक ड्रमचे वाटपही करण्यात आले. या प्रशिक्षणात ५० शेतकरी उपस्थित होते. संचालन व आभार जी.पी. कोरे केले. (प्रतिनिधी)
अधिक उत्पादन घेण्यासाठी सेंद्रीय खताचा वापर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2016 01:09 IST