गोंदिया : विटभट्टीवर कामावर असताना सूत जुळले, प्रेम प्रकरणात तरूणी गर्भवती झाली व तिच्यापासून पिच्छा सोडविण्यासाठी तरूणाने तिचा गळा आवळून खून केला. एवढेच नव्हे तर ओळख पटू नये यासाठी तिला अर्धवट जाळले. गोरेगाव तालुक्यातील देऊटोला-बबई गावालगत असलेल्या कालव्याजवळ घडलेली ही घटना सोमवारी (दि. १०) सकाळी ७ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. पौर्णिमा विनोद नागवंशी (१८, रा. मानेकसा) असे मृत तरूणीचे नाव आहे.प्राप्त माहितीनुसार, सोमवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास काही गावकऱ्यांना कालव्याजवळ महिलेचा मृतदेह जळालेल्या स्थितीत आढळला. गावकऱ्यांनी याची माहिती गोरेगाव पोलिसांना दिली असता पोलिस निरीक्षक अजय भुसारी यांनी ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले. तर पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांनीही घटनास्थळा भेट दिली. या प्रकरणाचा तपास करीत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी शकील मुस्तफा सिद्दीकी (३८, रा. मामा चौक, गोविंदपुर रोड, गोंदिया) याने तिचा खून केल्याचे उघडकीस आणून त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी कलम १०३,(१), २३८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
आधी आवळला गळा व नंतर जाळले -- आरोपीने मृत तरूणीचा गळा आवळून खून केला त्यानंतर तिची ओळख पटू नये यासाठी तिला जाळण्यात आल्याची कबूली दिली. तिच्या अंगावर चादर व तनस टाकून जाळून पुरावा नष्ट करण्याचे उद्देश्यातून तिचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे.तिच्यापासून सुटका करण्यासाठी केला खून -- मुलीला त्याने गरोदर केल्याने ती मुलगी आता पती-पत्नी म्हणून एकत्र राहू म्हणत असल्याने तिच्यापासून आपली सुटका करून घेण्याकरिता तिला जिवे मारले. आरोपीला गोरेगाव पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
यांनी केली कारवाई- पोलिस अधीक्षक गोरख भामरे, अप्पर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश लबडे, पोलिस निरीक्षक भुसारी, सहायक पोलिस निरीक्षक धीरज राजूरकर, महिला पोलिस उपनिरीक्षक वनिता सायकर, हवालदार राजू मिश्रा, नेवालाल भेलावे, चित्तरंजन कोडापे, विठ्ठल ठाकरे, महेश मेहर, भुवनलाल देशमुख, रियाज शेख, इंद्रजीत बिसेन, प्रकाश गायधने, दुर्गेश तिवारी, सुबोध बिसेन, अजय रहांगडाले, हंसराज भांडारकर, संतोष केदार, महिला शिपाई स्मिता तोंडरे, दुर्गेश पाटील, कुंभलवार, राम खंडारे, पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक ओमप्रकाश गेडाम, रोशन येरणे, योगेश रहिले यांनी ही कारवाई केली.