१६ पर्यंत मुदतवाढ : नूतनीकरण करण्याचे आवाहनगोंदिया: जिल्ह्यात परवान्यांचे नूतनीकरण न करता चालत असलेल्या आॅटोरिक्षांवर गंडांतर येणार आहे. असे आॅटो रस्त्यावर आढळल्यास ते जप्त करून पूर्णपणे नष्ट केले जाणार आहेत. त्यामुळे परवाने संपलेल्या आॅटोरिक्षा चालकांनी तातडीने त्यांचे नूतनीकरण करावे असे आवाहन अपर परिवहन आयुक्त एस.बी. सहस्त्रबुद्धे (मुंबई) तसेच गोंदियाचे प्र.उपप्रादेशिक पविहन अधिकारी एन.आर. निमजे यांनी केले.अपर आयुक्त सहस्त्रबुद्धे हे विदर्भाच्या दौऱ्यावर असताना शनिवारी सायंकाळी त्यांनी गोंदिया उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला भेट दिली. यावेळी शहरातील आॅटोरिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी तसेच पत्रकारांशी त्यांनी चर्चा करून शासनाच्या निर्णयाची माहिती दिली.जिल्ह्यात ८२९ आॅटोरिक्षा परवाने वैध आहेत. तर २५६ परवान्यांची मुदत संपलेली आहे. त्यापैकी नूतनीकरणासाठी ४१ अर्ज आले असून २१५ आॅटोरिक्षांच्या परवान्यांचे अद्याप नुतनीकरण झालेले नाही. नुतनीकरण न झालेल्या आॅटोरिक्षा आढळल्यास ते जप्त करून नष्ट केले जाणार आहे. ही वेळ कोणावरही येऊ नये आणि नूतनीकरणासाठी एक संधी मिळावी म्हणून १६ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती यावेळी सहस्त्रबुद्धे यांनी दिली. दि.१६ पर्यंत ज्यांचे परवाने नूतनीकरण होणार नाही त्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द केले जाणार आहे. आॅटोरिक्षांचे परवाने दर पाच वर्षांनी नूतनीकरण करावे लागते. त्यासाठी परवाना संपल्यानंतर ६ महिन्यांची मुदत असते. मात्र त्यानंतरही नुतनीकरण न करणाऱ्यांना दरमहिना १०० रुपये दंड आकारला जाणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)नवीन परवाने लवकरचजिल्ह्यात वाढत्या लोकसंख्येचा विचार करताना नवीन आॅटोरिक्षांचे परवाने दिले जाणार आहेत. मात्र ज्यांनी आधी परवाने घेतले होते पण ते नुतनीकरण न केल्यामुळे रद्द केले अशा लोकांना हे परवाने मिळणार नाहीत. त्यामुळे त्यांना आॅटोरिक्षाचा परवाना मिळण्यापासून कायमचे वंचित राहावे लागणार आहे. विनापरवाना चालणाऱ्या आॅटोरिक्षांची विशेष तपासणी मोहीम १५ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे.
विनापरवाना चालणारे आॅटोरिक्षा करणार नष्ट
By admin | Updated: November 2, 2015 01:28 IST