सालेकसा (गोंदिया) : तालुक्यातील गोर्रे येथील दोन तरुण कालव्यात आंघोळ करण्यासाठी गेले होते. मात्र पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने ते दोन्ही तरुण कालव्यात वाहून गेल्याची घटना शुक्रवारी (दि.२) दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. प्रशांत नरेंद्र पटले (२१) व प्रतीक दौलत बिसेन (२१) रा. गोर्रे अशी कालव्यात वाहून गेलेल्या तरुणांची नावे आहे.
प्राप्त माहितीनुसार सुमीत बिसेन, प्रशांत पटले आणि प्रतीक बिसेन हे तिघेही मित्र आहेत. प्रतीक हा एमबीबीएसचे शिक्षण घेत आहे. तर प्रशांत पदवी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. प्रतीक बिसेन हा सुट्टी घेऊन गोर्रे येथे आला होता. तो प्रशांत बिसेन आणि सुमित बिसेन (१८) या दोन्ही मित्रांना घेऊन तिघेही पुजारीटोला धरणाच्या मध्यप्रदेशकडे जाणाऱ्या मोठ्या कालव्यात निंबाटोला गावाजवळ शुक्रवारी (दि.२) दुपारी १२ वाजता आंघोळ करण्यासाठी गेले होते. कालव्यात तिघेही आंघोळ करीत असताना पाण्याचा प्रवाह वाढल्याने प्रशांत व प्रतीक हे दोघेही गेले. त्यांना वाचविण्यासाठी सुमितने कालव्यात उडी घेतली. परंतु पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने तोही वाहून गेला. परंतु त्यांने कालव्यातील एका झाडाला पकडले आणि जोर लावून तो कालव्या बाहेर पडला. यानंतर सुमितने गोर्रे गावात येऊन दोन्ही मित्र कालव्यात वाहून गेल्याची माहिती दिली. यानंतर दोन्ही तरुणांचे कुटुंबीय व गावकऱ्यांनी कालव्याकडे धाव घेतली. तसेच या घटनेची माहिती सालेकसा पोलिसांना दिली. माहिती मिळताच सालेकसा पोलिसांनी घटनास्थळ गाठून कालव्यात शोध मोहीम सुरु केली.
सायंकाळी उशिरापर्यंत सुरु होती शोध मोहीम
पुजारीटोला धरणाच्या कालव्यातून सध्या रब्बी पिकांसाठी पाणी सोडले जात आहे. याच कालव्यात आंघोळ करण्यासाठी प्रशांत, प्रतीक आणि सुमीत हे तिन्ही मित्र गेले होते. पण पाण्याचा प्रवाह वाढल्याने दोघेही कालव्यात वाहून गेले. प्रतीक आणि प्रशांतचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी कालव्यात शोध मोहीम सुरु केली. पण शुक्रवारी सायंकाळी उशीरापर्यंत दोघांचा शोध लागला नव्हता.