कपिल केकत - गोंदिया
शहरात आजच्या स्थितीत किती उद्याने आहेत, असा प्रश्न विचारल्यास कोणीही उत्तर देईल, एक उद्यान, ते म्हणजे शहराच्या मध्यवस्तीमधील सुभाष गार्डन. पण हे उत्तर चुकीचे आहे. गोंदिया नगर परिषदेच्या नोंदीनुसार आजही शहरात तीन उद्याने आहेत. पण त्यापैकी दोन उद्याने सध्या गायब झाली आहेत. मात्र नागरिकांची मागणी लक्षात घेता आता कोठे जाऊन नगर परिषद कृष्णापुरा वॉर्डातील उद्यानास पुनर्जिवीत करण्याचा प्रयत्न करीत आहे. यामुळेच उद्यानाच्या जागेवरही विकास कामांना सुरूवात केली आहे. मात्र आजघडीला येथे फक्त मैदानच असल्याने हे उद्यान सुद्धा गायब आहे असे बोलणे वावगे ठरणार नाही. एकंदर शहरातील दोन उद्यान गायब झाल्याचे दिसून येते. गायब झालेली दोन उद्याने कुठे आहेत असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असणार. त्यापैकी एक उद्यान आहे कृष्णपुरा वॉर्डात तर दुसरे आहे रेलटोलीमधील पाण्याच्या टाकीजवळील. पण डोळे फाडून पाहीले तरी त्या ठिकाणी आता उद्यान दिसत नाही. कधीकाळी त्या जागेवर उद्यान होते. पण नगर परिषदेच्या हलगर्जीपणाने ही दोन्ही उद्याने आता ओसाड होऊन नाहीशी झाली आहेत. आज त्यापैकी एका जागेवर खेळाचे मैदान तयार झाले तर दुसरे उद्यान बांधकामाची वाट बघत आहे. तरीही नगर परिषदेच्या नोंदी अजूनही त्या जागेवर उद्याने असल्याचे सांगत आहेत. शहरात सुरुवातीला सुभाष बाग, कृष्णपुरा वॉर्डात व रेलटोली येथील पाण्याच्या टाकीच्या खाली अशी तीनही उद्याने बहरलेली असायची. अनेक दिवस या उद्यानांचे संगोपन केले जात होते. त्यानंतर रेलटोली येथील उद्यानाकडे नगर परिषदेने कायमचे दुर्लक्ष केल्याने या उद्यानाच्या ठिकाणी खेळाचे मैदान तयार झाले. या उद्यानाच्या जागेवर आता गोंदिया-बालाघाट मार्गावर धावणारी खासगी वाहने प्रवाशांच्या शोधात उभी दिसतात. कृष्णपुरा वॉर्डातील यादव चौकात असलेले उद्यानही आता ओसाड झाले आहे. पडीत जमिनी शिवाय येथे काहीच उरले नव्हते. नगर परिषदेच्या नोंदीत मात्र हे उद्यान आहे. शहरातील जनतेच्या जागृतीने एक ओरड निर्माण झाली व त्याला प्रतिसाद देत नगर परिषद सदस्य पंकज यादव यांनी हे उद्यान पुन्हा जिवीत करण्यासाठी नगर परिषदेत प्रयत्न चालविले. त्यामुळे वैशिष्टपूर्ण योजनेंतर्गत या जागेवर सुरक्षा भिंत, पायवाट व सौंदर्यीकरणासारखे सुमारे ५५ लाख रूपयांच्या निधीतून विकास काम करण्याचे नियोजीत आहे. मात्र यातील सुरक्षा भितींचे व पायवाटचेच काम सध्या झाल्याचे दिसून येत आहे. तर सौंदर्यीकरणा अभावी जागा ओसाड पडून आहे. एकंदर अद्याप या जागेला उद्यानाचे स्वरूप आलेले नाही. याशिवाय समोर असलेल्या खुल्या जागेवर महिला व बाल कल्याण विभागाकडून खाही घरसणपट्टी व झुले लावण्यात आले आहेत. तर नगर परिषद या जागेवर आता काही नवा प्रयोग करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे कसेबसे तग धरून असलेले सिव्हिल लाईन परिसरात सुभाष गार्डन हे एकच उद्यान शहवासीयांना माहीत आहे. मात्र या ठिकाणीही खेळणी आणि सुविधांच्या नावावर बोंबाबोंब आहे. वर्षाकाठी लाखो रुपयांचा खर्च या उद्यानावर दाखविला जातो. पण गेल्या तीन वर्षात या उद्यानात एकही नवीन खेळणी दिलेली नाही. सुभाष उद्यानात असलेले मुलांचे झोपाळे, खेळण्याचे साहित्य तुटलेले आहेत. येथील सौंदर्यीकरणासाठी उभारण्यात आलेले पुतळे विद्रुप झाले आहेत. ‘मातेचे दूध बाळाची गरज’ याचा संदेश देणार्या प्रतिमेची दुरवस्था झाली आहे. बाळाचे पाय तुटले तर आईचा हात तुटला आहे. सौंदर्यीकरणासाठी एकाच ठिकाणी दोन बाजूला जलपरी उभारण्यात आल्या होत्या. मात्र योग्य देखरेख नसल्याने या परींचे हात छाटल्या गेले. उन्हाळ्याच्या दिवसात या परीजवळून पाण्याचे फवारे उडत होते. ते ठिकाण आता पाण्याविना दुष्काळ पडल्यासारखे दिसत आहे. येथील सौंदर्यीकरणासाठी नगर परिषदेकडून लाखो रुपये दरवर्षी खर्च केल्याचे नुसते कागदावर दाखविले जाते. मात्र प्रत्यक्षात ही बागही पाण्याविना ओसाड झाली आहे. शहर विकास योजनेंतर्गत दरवर्षी मुलांसाठी खेळणी, उद्यानाच्या विकासासाठी वृक्षारोपण, फुलांची झाडे खरेदी करणे, फवारे लावणे व बसण्यासाठी जागा उभारण्याचे काम नगर परिषदेतर्फे केले जाते, असे नगरपरिषद सांगते. मात्र आता उन्हाळा सुरू असतानाही या उद्यानात फवारे बसविण्यात आलेले नाही. या उद्यानाच्या सौंदर्यीकरणासाठी सन २०११-१२ या वर्षात १९ लाख ६० हजार ९६३ रुपये खर्च करण्यात आले. त्यात पाणी पंपावर ७६ हजार ८३ रुपये, बागेच्या सौंदर्यीकरणावर दोन लाख १९ हजार २२५ रुपये, आकस्मिक खर्च म्हणून तीन लाख ७७ हजार ८५२ रुपये, स्थायी कर्मचार्यांचे वेतन म्हणून एक लाख ७० हजार ५९५ रुपये तर रोजंदारी व अस्थायी असलेल्या कर्मचार्यांसाठी ११ लाख १७ हजार २०८ रुपये खर्च करण्यात आले. सन २०१२-१३ या वर्षात १२ लाख २३ हजार ५६६ रूपये खर्च करण्यात आले. त्यात पंप हाऊस, सौंदर्यीकरण यारख्या कामांवर काहीच खर्च करण्यात आलेला नाही. फक्त स्थायी व अस्थायी कर्मचार्यावरच खर्च करण्यात आलेला आहे. तर सन २०१३-१४ या वर्षात सर्वाधीक २२ लाख ७५ हजार रूपयांचा खर्च करण्यात आला आहे. यामध्ये अस्थायी कर्मचार्यावर सात लाख ५० हजार रूपये, आकस्मिक खर्चात पाच लाख रूपये, पंप हाऊसवर एक लाख रूपये, बागेतील रस्ते व पायवाट देखरेखवर ७५ हजार रूपये, सौंदर्यीकरणावर तीन लाख ५० हजार रूपये तर सुरक्षा गार्डवर पाच लाख रूपये खर्च करण्यात आल्याचे कळले. मात्र उद्यानातील उभारलेले पुतळे