लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आरोग्य विभागाच्यावतीने गट ड पदासाठी रविवारी (दि.३१) गोंदिया येथील २५ परीक्षा केंद्रांवरून परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी जिल्ह्यातील ६९१३ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. मात्र, परीक्षेच्या दिवशी प्रत्यक्षात ४८७१ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात हजेरी लावून परीक्षा दिली. तब्बल २ हजार ४८ विद्यार्थ्यांनी परीक्षेला दांडी मारली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचासुद्धा काही प्रमाणात विद्यार्थ्यांना फटका बसला. आरोग्य विभागातर्फे गट क आणि ड करिता यापूर्वी परीक्षा घेण्यात येणार होती; परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांना वेळीच प्रवेश पत्र न मिळाल्याने यात प्रचंड घोळ असल्याने परीक्षेच्या एक दिवसापूर्वीच परीक्षा रद्द करण्याची वेळ आरोग्य विभागावर आली होती. त्यामुळे आरोग्य विभागाने गट क आणि ड च्या पदासाठी परीक्षेच्या नवीन तारखा घोषित केल्या. २४ ऑक्टोबरला राज्यात विविध ठिकाणी गट क साठी परीक्षा घेण्यात आली, तर रविवारी (दि.३१) गट ड पदासाठी त्या त्या जिल्ह्यातच परीक्षा घेण्यात आली. गोंदिया जिल्ह्यातून गट ड पदासाठी एकूण ६९१३ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. त्यामुळे यासाठी २५ परीक्षा केंद्रांची व्यवस्था आरोग्य विभागातर्फे गोंदिया येथे करण्यात आली. सकाळी ११ ते दुपारी २ या कालावधीत ही परीक्षा घेण्यात आली. एकूण २५ परीक्षा केंद्रांवरुन ४८७१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तब्बल २ हजार ४८ विद्यार्थ्यांनी परीक्षेला दांडी मारली. सर्वच २५ परीक्षा केंद्रांवरून सुरळीतपणे परीक्षा पार पडली. एसटी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मागण्यांना घेऊन बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचासुद्धा रविवारी घेण्यात आलेल्या आरोग्य विभागाच्या परीक्षेला फटका बसला.
प्रवेश पत्रावरील रोल नंबरमध्ये चुुका- आरोग्य विभागातर्फे घेण्यात येणारी पूर्वनियोजित परीक्षा अनेक त्रुटींमुळे रद्द करावी लागली होती. यामुळे परीक्षार्थ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला होता. त्यामुळे यानंतर तरी त्रुटी राहणार नाही, अशी अपेक्षा होती, पण रविवारी घेण्यात आलेल्या गट ड च्या परीक्षेकरीता विद्यार्थ्यांना पाठविण्यात आलेल्या प्रवेश पत्रावरील रोल नंबर चुकीचे देण्यात आले होते. त्यामुळे थोडा गोंधळ उडाला होता.परीक्षा केंद्रावर दिले नवीन प्रवेश पत्र- आरोग्य विभागाच्या परीक्षेपासून एकही परीक्षार्थी वंचित राहू नये यासाठी परीक्षा केंद्रावर वेळेवर विद्यार्थ्यांना नवीन ओळखपत्र तयार करून देण्यात आले. यामुळे परीक्षार्थ्यांची गैरसोय टळून त्यांना परीक्षा देणे शक्य झाले.
आरोग्य विभागाच्या गट ड पदाकरिता गोंदिया येथील एकूण ३० परीक्षा केंद्रांवरून रविवारी परीक्षा घेण्यात आली. एकूण ४८७१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. सर्वच परीक्षा केंद्रांवरून सुरळीत परीक्षा पार पडली. - डॉ. अमरिश मोहबे, जिल्हा शल्यचिकित्सक.