दुचाकींना धडक : हिंगणघाट व नंदोरी येथील घटना हिंगणघाट : जिल्ह्यात दोन ठिकाणी झालेल्या वेगवेगळ्या अपघातात दोघे जण ठार झाले तर तिघे गंभीर जखमी झाले. यात एक अपघात हिंगघाट येथे सोमवारी दुपारी झाला तर दुसरा अपघात नंदोरी येथे रविवारी सायंकाळी घडला. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ वरील कुटकी नजीक एका भरधाव कारने दुचाकीला धडक दिली. यात एक जण जागीच ठार झाला तर दोघे गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारार्थ सेवाग्राम रुग्णालयात हलविण्यात आले. ही घटना सोमवारी दुपारी १.१५ वाजताच्या सुमारास घडली. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वडनेर येथून हिंगणघाटकडे जात असलेल्या एमएच ३२ एन २१७३ या दुचाकीला कार एचआर २६ एएन ३२२५ ने जबर धडक दिली. सदर कार नागपूरकडून पांढरकवडा येथे जात होती. यात मोटरसायकल स्वार ऋषी नरहरी उमरे (४५), हर्ष ऋषी उमरे (१४) तसेच अन्नाजी मारोतराव कावडे (६५) सर्व राहणार बामर्डा हे गंभीर जखमी झाले. या सर्व गंभीर जखमींना हिंगणघाट रुग्णालयात उपचारार्थ नेण्यात आले. अन्नाजी कावडे यांना सेवाग्राम येथे उपचारार्थ नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. ऋषी उमरे व त्यांचा मुलगा हर्ष उमरे या दोघांना सेवाग्राम येथे उपचारार्थ हलविले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. हिंगणघाट येथे खरेदीसाठी जात असतांना हा अपघात झाला. हिंगणघाट पोलीस ठाण्यात घटनेची नोंद केली असून घटनेचा तपास कैलास दाते करीत आहे. (तालुका प्रतिनिधी)