देवरी शहराची तहान ही नजीकच्या शिरपूर येथील धरणावरील पाण्याने भागविली जात आहे. शिरपूर येथे असलेल्या पाणी शुद्धिकरण केंद्रातील विहिरीमध्ये एका छोट्या नहराच्या साहाय्याने पाण्याचे पाणी आणले जाते. या धरणातील पाण्याची पातळी कमी झाल्याने तिथे गाळ साचला. परिणामी विहीर आणि धरण यांच्यातील दुवा असलेला नहर अवरुद्ध झाला. हा निर्माण झालेला अवरोध दूर करण्यासाठी देवरीचे मुख्याधिकारी अजय पाटणकर यांच्या नेतृत्वात पाणीपुरवठा चमूने अथक परिश्रम घेऊन हा अडथळा अखेर दोन दिवसांत दूर केला. यामुळे देवरीकरांत आनंदाचे वातावरण असून नागरिकांनी नगर प्रशासनाचे आभार मानले आहेत. धरणातील पाण्याची पातळी खाली गेल्याने कराव्या लागल्या दुरुस्तीमुळे किमान दोन दिवस नागरिकांनी पाणी उकळून पिण्याच्या सूचना देण्यात आली आहे. याशिवाय उन्हाळ्यामध्ये धरणातील पाण्याची पातळी कमी होत असल्याने नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा अपव्यय टाळून केवळ अत्यावश्यक कामासाठीच पाण्याचा वापर करावा. कोणत्याही नागरिकांनी रस्त्यावर पाण्याचा सडा वा वाहन धुण्यासाठी पाण्याचा वापर करू नये आणि प्रशासनाला पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यास मदत करावी, असे मुख्याधिकारी अजय पाटणकर यांनी कळविले आहे.
दोन दिवसांनंतर देवरीवासीयांना मिळाले पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:27 IST